पुणे : ‘कुटुंबासह श्रीनगरच्या सहलीचा बेत आखला. सप्टेंबर महिन्यात चौघांची विमानाची तिकिटेही काढली. सगळे काही नक्की झाले. पण पुणे विमानतळ बंद होणार असल्याची घोषणा झाली अन आमच्या आनंदावर विरजण पडले. तब्बल ३० हजार रुपये जास्त मोजावे लागले अन विमानाची तिकिटे रीरूट करावी लागली.... ते करताना झालेला मनस्ताप हतबल करणारा ठरला,’ सांगत होते प्रवासी अनिश नहार. लोहगाव विमानतळ अचानक १५ दिवसांसाठी बंद झाल्यामुळे अनेकांच्या सहलींमध्येच नव्हे तर दैनंदिन कामातही आर्थिक विघ्ने आली आहेत.
धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी लोहगाव विमानतळ १६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान संपूर्णतः बंद राहणार आहे. या बाबतची घोषणा ५ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या सहलींचे तसेच प्रवासाच्या वेळापत्रकाची फेररचना करावी लागली. त्यातील एक नहार म्हणाले, ‘‘आम्ही १८ ऑक्टोबरला सहलीला जाणार आहोत. हॉटेलचे बुकींगही झाले. मुंबईहून श्रीनगरची तिकिटे स्वस्त असूनही आम्ही पुण्यातून तिकिटे काढली होती. पण, विमानतळ बंद राहणार असल्यामुळे आम्हाला अधिकचा तब्बल ३० हजार रुपयांचा भुर्दंड पडला. त्याशिवाय पुणे- मुंबई, मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ आणि खर्चही वाढला.’’
पुण्यातून दक्षिण भारतात दरमहा प्रवास करणारे उद्योजक नितीन बारावकर यांनी २५ ऑक्टोबर रोजी पुणे- चेन्नई- हैदराबाद- पुणे अशा प्रवासाची तिकिटे काढली. विमानतळ बंद राहणार असल्यामुळे त्यांचे बिझिनेस शेड्यूल, मिटिंग्ज अडचणीत आल्या. तेथील उद्योजकांच्या अपॉईंटमेंट त्यांनी निश्चित केल्या. परंतु, आता त्यांना प्रवासाचे शेड्यूल बदलावे लागले. तसेच मुंबई- पुणे प्रवासाचा त्रासही वाढला. बारवकर म्हणाले, ‘‘विमानतळ प्रशासनाने या बाबतची घोषणा किमान १ महिन्यापूर्वी करायला पाहिजे होती. त्यानुसार प्रवाशांना प्लॅन करता आले असते.’’ विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, उद्योजक आणि पर्यटकांनाही अचानक झालेल्या घोषणेमुळे अनेक अडणींचा सामना करावा लागत आहे.
निलेश भन्साळी (संचालक, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन ऑफ पुणे) : विमानतळ दुरुस्तीचे काम एप्रिलपूर्वी किंवा दिवाळीनंतरही करता आले असते. निर्बंध शिथिल झाल्यामुळे आत्ता कोठे नागरिक बाहेर पडू लागले आहेत. परंतु, अचानक विमानतळ बंद झाल्याने पुण्यातील पर्यटक व्यवसायाचे आणि पर्यटकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
संतोष ढोके (संचालक, लोहगाव विमानतळ) : विमानतळाची दुरुस्ती हवाई दलाकडून होणार आहे. त्यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार सध्या कार्यवाही सुरू आहे. प्रवाशांच्या काही समस्या असतील तर त्यांनी संबंधित विमान वाहतूक कंपन्यांशी संपर्क साधावा. विमान कंपन्यांनीही विमानतळ प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.
लोहगाव विमानतळ बंद असल्यामुळे तुम्हाला त्रास झाला असल्यास आम्हाला त्याची माहिती तुमच्या नावासह ८४८४९७३६०२ या सकाळच्या व्हॉटसअप क्रमांकावर कळवा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.