पुणे : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय हिताच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संज्ञापन व पत्रकारिता विभाग आणि माध्यम व संज्ञापन अभ्यास विभाग या दोन्ही विभागांच्या एकत्रिकरणाचा निर्णय घेतला होता. परंतु विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत प्रदीर्घ चर्चा केली. या चर्चेनुसार रानडे इन्स्टिट्युटमधील पत्रकारिता विभाग आणि तेथील अभ्यासक्रमाचे एकत्रीकरणास स्थगिती देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागाची १९६४मध्ये पत्रकरितेतील पदविका अभ्यासक्रमाने सुरवात झाली. या विभागाला १९७६मध्ये एक स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता मिळाली. रानडे इन्स्टिट्युटची इमारत आणि आवार विद्यापीठाने पोटभाडे कराराने घेतला असून त्याची मालकी विद्यापीठाकडे नाही. भाडे कराराची बाब सध्या न्याप्रविष्ट आहे. या जागेच्या विक्री अथवा हस्तांतरणाबाबत चर्चा आणि गैरसमज पसरविला जात असून ते वस्तुस्थितीस धरून नसल्याचे विद्यापीठाने सांगितले.
विद्यापीठाच्या २०११मध्ये झालेल्या नॅक मूल्यांकनात अहवालात विभागांना स्कूल सिस्टिम अर्थात प्रशाला पद्धती लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांची पूर्तता न केल्याने २०१७ मध्ये नॅक पूर्नमूल्यांकनात देखील याबाबत आदेश दिले असून त्याची तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्यानुसार चार विद्याशाखेतील संबंधित विभागांना एका ‘प्रशाले’खाली आणून एकूण १८ प्रशालांद्वारे ‘स्कूल्स सिस्टिम’ची स्थापना करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान विशेष साधर्म्य असणाऱ्या विभागांची शैक्षणिक हिताच्या दृष्टीने एकत्रीकरण करण्यात आले. यात ‘संज्ञापन व पत्रकारिता विभाग’ आणि ‘माध्यम व संज्ञापन अभ्यास विभाग’ या दोन्ही विभागांच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेतला होता. निर्णय प्रक्रियेत संबंधित विभागप्रमुख, पत्रकारितेच्या क्षेत्रातील तज्ञ तसेच विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकांच्या समितीचा समावेश होता. याविषयीचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येत होते. त्यामुळे निर्णय पूर्णपणे पारदर्शी ठेवण्यात आला होता.
पत्रकारिता विभागास सध्या उपलब्ध जागा मर्यादित असल्याने, तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे बांधकाम व दुरूस्तीस मर्यादा असल्यामुळे भौतिक सुविधांचा प्रश्न वारंवार विद्यापीठ अधिकार मंडळापुढे मांडण्यात आला. पदवीच्या विद्यार्थ्यांना वसतीगृहासाठी विद्यापीठातून ये-जा करावी लागत असल्याने त्यांची गैरसोय आणि अतिरिक्त खर्चाचा प्रश्न विद्यापीठाच्या विचाराधीन होता. तसेच या निर्णयानुसार एकत्रित केलेल्या दोन्ही विभागांचे सर्व अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार होते. केवळ एम.सी.जे (प्रवेश क्षमता) हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या मुख्य आवारात स्थलांतरित करून त्यास स्टुडिओसह सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित होते. तसेच पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील ईएमएमआरसी आणि विद्यावाणी यांच्याशी प्रशिक्षणासाठी जोडण्यात यावे, असे विचारात होते. त्याशिवाय रानडे इन्स्टिट्युटमध्ये पूर्वीप्रमाणे पदविका अभ्यासक्रम (प्रवेश क्षमता १२०) सुरू राहणार असून, त्यासोबत नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर ओरिएंटिड पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.
परंतु, संज्ञापन व पत्रकारिता विभागाच्या एकत्रीकरणाच्या निर्णयाबाबत गैरसमजुतीतून संभ्रम निर्माण करण्यात आला. याबाबत पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने गुरूवारी डॉ. करमळकर यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार आणि संघाच्या निवदेनाच्या अनुषंगाने विद्यापीठाने रानडे इन्स्टिट्युटमधील पत्रकरिता विभाग तसेच अभ्यासक्रमाच्या एकत्रीकरणास स्थगिती दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.