बायोगॅसपासून वीज अन्‌ प्रॉम खतनिर्मिती

बारामती येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स, डेअरी‘मध्ये बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.
Power and prom fertilizer production from biogas
Power and prom fertilizer production from biogassakal media
Updated on

पुणे : बारामती येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स, डेअरी‘मध्ये बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. पुण्यातील ऊर्जा बायो सिस्टिम प्रा.लि. या कंपनीने बायोगॅसपासून वीजनिर्मिती तसेच बायोगॅस स्लरीपासून घन आणि द्रवरूप सेंद्रिय खतनिर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यातून लहान, मोठे पशुपालक तसेच व्यावसायिक डेअरी उद्योगाला हरित ऊर्जा आणि खतनिर्मितीची नवीन संधी उपलब्ध झाली आहे.

व्यवस्थापनाचा वाढता खर्च, चारा-पशुखाद्याच्या वाढत्या किमती आणि बदलत्या हवामानाचा गाई, म्हशींचे आरोग्य आणि दूध उत्पादनावर झालेला परिणाम लक्षात घेता पशुपालकांना अपेक्षित नफा मिळत नाही. हे लक्षात घेऊन पुण्यातील ऊर्जा बायो सिस्टिम प्रा.लि. या कंपनीने बायोगॅसपासून वीजनिर्मिती तसेच बायोगॅस स्लरीपासून घन आणि द्रवरूप सेंद्रिय खतनिर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाबाबत कंपनीचे कार्यकारी संचालक गजानन पाटील म्हणाले, की शेणाचे मूल्यवर्धन केल्यास निश्‍चितपणे पशुपालकांना आर्थिक उत्पन्नवाढीस चांगली संधी आहे. आमच्या कंपनीने १८ राज्यांत, तसेच तीन देशांमध्ये बायोगॅसवर आधारित वीजनिर्मिती प्रकल्पांची उभारणी केली आहे. बायोगॅस स्लरीमध्ये जमीन सुपीकतेच्या दृष्टीने उपयुक्त जिवाणू असतात. हे लक्षात घेऊन सेंद्रिय खत निर्मितीसाठी बायोगॅस स्लरीतील घन आणि द्रव घटक वेगळे केले आहेत. त्यांचे मूल्यवर्धन करून फॉस्फेट रिच ऑरगॅनिक मॅन्यूअर (प्रॉम) या दर्जेदार सेंद्रिय खताची निर्मिती केली आहे.

‘सेंटर ऑफ एक्सलन्स, डेअरी‘मध्ये बायोगॅस प्रकल्प

बायोगॅसपासून वीज आणि सेंद्रिय खत निर्मितीबाबत गजानन पाटील म्हणाले, की बारामती येथील पशुधन अनुवंश उच्चता गुणवत्ता केंद्रामध्ये (सेंटर ऑफ एक्सलन्स, डेअरी) प्रॉम खतनिर्मिती प्रकल्पाला सुरुवात झाली. प्रकल्पाच्या उभारणीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट'चे चेअरमन राजेंद्र पवार आणि विश्‍वस्त रणजित पवार तसेच रवींद्र नातू, सुहास हिंगणे, नीलेश नलावडे, डॉ. धनंजय भोईटे, मिलिंद पाणदरे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

सध्या डेअरी प्रकल्पामध्ये सुमारे ४०० जनावरे आहेत, येत्या काळात या ठिकाणी १००० जनावरांचे संगोपन केले जाणार आहे. त्यादृष्टीने आम्ही दररोज दहा टन शेणावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात बायोगॅसचा वापर करून दररोज ५०० युनिट वीजनिर्मिती होणार आहे. शेणस्लरीचे मूल्यवर्धन करून दररोज २,५०० किलो प्रॉम खत, १३,००० लिटर द्रवरूप सेंद्रिय खत आणि ठिबक सिंचनातून देता येईल असे २,००० लिटर मूल्यवर्धित द्रवरूप सेंद्रिय खत तयार होईल.

प्रकल्पामध्ये बायोगॅसपासून वीजनिर्मितीसाठी ५० केव्हीए क्षमतेचे दोन जनरेटर कार्यरत आहेत. त्यापासून दररोज १५ तास ४० किलोवॉट वीजनिर्मिती होते. या विजेचा वापर मिल्किंग पार्लर, चॉप कटर, डीप फ्रिज,फॅन, प्रयोगशाळेतील उपकरणे, गोठ्यातील दिवे आणि दूध प्रक्रिया यंत्रणेसाठी होणार आहे. या प्रकल्पामुळे डेअरीच्या वीजबिलामध्ये वार्षिक १४ लाखांची बचत होईल. महत्त्वाचे म्हणजे ही हरित ऊर्जा असल्याने पर्यावरणामध्ये प्रदूषणाचा धोका नाही. तसेच दहा जणांना याप्रकल्पामध्ये कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे. मिळणारे उत्पन्न आणि फायदे लक्षात घेता येत्या तीन वर्षांत या प्रकल्पाचा गुंतवणूक खर्च निघणार आहे.

आर्थिक मिळकत

  • बायोगॅस प्रकल्पातून दररोज २५०० किलो प्रॉम खतनिर्मिती. प्रति किलो १५ रुपये बाजारभाव लक्षात घेता खर्च वजा जाता दर महिना पाच लाखांचे उत्पन्न.

  • दररोज १५,००० लिटर बायोगॅस स्लरीचे उत्पादन. त्यातील १३,००० लिटर स्लरी पन्नास पैसे लिटर दराने विक्री करता दर महिन्याला खर्च वजा जाता दिड लाख रुपयांचे उत्पन्न.

  • गाळलेले मूल्यवर्धित द्रवरूप स्लरीचे दररोज २००० लिटर उत्पादन. याची प्रति सहा रुपये लिटर दराने विक्री. दर महिन्याला दीड लाखांचे उत्पन्न.

  • बायोगॅस स्लरीपासून तयार केलेल्या तीन सेंद्रिय खतांच्या विक्रीतून दर महिना आठ लाखांचे उत्पन्न. महिन्याला एक लाख रुपयांची वीजबिलामध्ये बचत.

  • जर हा प्रकल्प नसता तर दर महिन्याला शेण विक्रीतून केवळ दोन लाखांचे उत्पन्न मिळाले असते.

...असा आहे प्रकल्प

  • मेकॅनिकल स्क्रॅपरने गोठ्यातील सर्व शेण एका टाकीत गोळा होते. त्यानंतर शेणाच्या प्रमाणात पाणी मिसळले जाते. दिवसाला २०,००० लिटर स्लरी तयार होते.

  • टाकीत तयार झालेली शेणस्लरी बायोगॅस प्लांटमध्ये जाते. या

  • ठिकाणी ४० दिवसांनी गॅसनिर्मिती सुरू होऊन बायोगॅस स्लरी बाहेर येते. या प्रकल्पातून दिवसाला ४०० ते ५०० घनमीटर बायोगॅस तयार होतो.

  • तयार झालेल्या बायोगॅस शुद्धीकरण यंत्रणेमध्ये पाठविला जातो. या ठिकाणी बायोगॅसमधून हायड्रोजन सल्फाइड आणि पाणी वेगळे केले जाते. शुद्धीकरण केलेला बायोगॅस दीड लाख लिटर क्षमतेच्या बलूनमध्ये साठविला जातो.

  • साठविलेला बायोगॅस हा किर्लोस्कर ऑइल इंजिन उत्पादित बायोगॅसचलित जनरेटरमध्ये वीजनिर्मितीसाठी पाठविला जातो. दर तासाला २५ घन मिटर शुद्ध बायोगॅस या जनरेटरला पुरविला जातो. त्यातून ४० युनिट वीज तयार होते.

लहान पशुपालकांसाठी बायोगॅस प्रकल्प

  • ज्या पशुपालकाकडे १० ते १५ देशी गाई किंवा संकरित गाई आहेत, त्यांच्यासाठी बायोगॅस संयंत्र उपलब्ध. या संयंत्राची प्रतिदिन दहा घनमीटर बायोगॅस निर्मिती क्षमता (चार केजी एलपीजी प्रतिदिन)

  • बायोगॅस प्रकल्प योग्य पद्धतीने चालण्यासाठी प्रतिदिन दोनशे किलो शेणाची आवश्यकता.

  • बायोगॅसमधून प्रतिदिन चारशे लिटर स्लरी निर्मिती.

  • बायोगॅस संयंत्र, खत आणि पाणी वेगळे करणारा फिल्टर तसेच शेगडी अशा युनिटची किंमत ३ लाख ७५ हजार रुपये. प्रकल्पाद्वारे उत्पादीत बायोगॅसमुळे एलपीजीची बचत होते.साधरणपणे प्रति वर्ष नव्वद हजार रुपयांची बचत.

  • घन स्वरूपातील शेण स्लरीपासून प्रॉम निर्मिती. याच्या विक्रीतून प्रती वर्षी साधारण एक लाख पंचवीस हजार तसेच शेणस्लरीच्या विक्रीतून प्रतिवर्षी ७०,००० रुपयांचे उत्पन्न अपेक्षित.

  • प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाची वर्षभराची एलपीजी गॅस आणि शेतीसाठी सेंद्रिय खताची गरज परिपूर्ण. अतिरिक्त प्रॉम खत, शेण स्लरी विक्रीतून उत्पन्नाचा स्त्रोत. या प्रकल्पास शासनातर्फे बारा हजार रुपयांपर्यंत अनुदान.

ज्या पशुपालकांकडे २ ते ३ गाई आहेत, त्यांच्यासाठी देखील बायोगॅस संयंत्र विकसित करण्यात आले आहे. याची क्षमता प्रति दिन दोन घनमीटर आहे. बायोगॅस संयंत्रासोबत फिल्टर आणि शेगडी अशी एकत्रित किंमत ५०,००० आहे. या संयंत्रासाठी १२,००० रुपयांचे अनुदान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.