फुलविक्रेत्याचा मजूर बनला यशस्वी उद्योजक !

त्यामुळे ते मित्रांसह देलवडीतील घर ते नाथाचीवाडी असे १२ किलोमीटरच्या अंतर अनवाणी ये
pune
punesakak
Updated on

कष्टाला योग्य दिशा मिळाली की जीवन सार्थक होते. कोणत्याही कामाला कमी न लेखता स्वत: रोजगार मिळवण्याबरोबरच अन्य लोकांनाही रोजगार देणारे पुणे जिल्ह्यातील देलवडी येथील पोपटराव शेलार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. फूल आणि घरोघरी जाऊन फूल टाकणारा तरुण ते अनेक कुटुंबांना रोजगार देणारा उद्योजक अशी वाटचाल करणारे शेलार यांनी समाजसेवेचे व्रतही जोपासले आहे.

- प्रकाश शेलार, खुटबाव, जि. पुणे

देलवडी (ता. दौंड )येथे एका शेतमजुरांच्या कुटुंबामध्ये पोपटराव शेलार यांचा जन्म झाला. आई सरस्वती व वडील रघुनाथ शेलार हे रोजगार हमीची कामे करत. त्यांनी पोपटराव यांच्यासह सहा भावंडांची गुजराण केली. वडिलांनी गावातील एका सधन कुटुंबामध्ये सालगडी म्हणून काम केले.

याशिवाय या दांपत्याने खोपोली येथील टाटा प्रोजेक्ट, पुणे येथील रेस कोर्स मैदान, भुलेश्वर येथील रस्त्याच्या कडेला अनेक मजुरीची कामे केली. शेलार यांचे प्राथमिक शिक्षण देलवडीतील झेडपी शाळेत झाल्यानंतर ते पुढे माध्यमिक शिक्षणासाठी खोपोलीत मामाच्या घरी गेले. केडगावच्या जवाहरलाल विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर ते पुन्हा दहावीसाठी माटोबा विद्यालय, नाथाचीवाडी येथे आले. शाळा दूर असायची. त्यांना जाण्यासाठी साधी सायकल मिळत नव्हती.

त्यामुळे ते मित्रांसह देलवडीतील घर ते नाथाचीवाडी असे १२ किलोमीटरच्या अंतर अनवाणी ये -जा करायचे. दहावी पास झाल्यानंतर‌ वर्षभर गावांत अनेक शेतमजुरीची कामे केली. शेतात खुरपणी ,लाकूड गोळा करणे अशी कामे केली. त्यानंतर मुंबई येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या हाताखाली शेलार यांनी फुले विकण्याचे काम सुरु केले. घरोघरी हार देणे, फुलांचे हार विणणे, गजरे तयार करणे अशी छोटी-मोठी कामे शेलार यांनी ८ वर्षे केली.

त्याकाळी लिफ्ट नसल्यामुळे उंच उंच इमारतीत चढउतार करताना अक्षरशः दमछाक व्हायची. एकदा घरोघरी हार टाकताना मुंबई येथे‌ कंपनी क्षेत्रातील मार्गदर्शक भेटले आणि त्यांनी शेलार यांना आयटीआय करण्याचा सल्ला दिला. यादरम्यान चतुरा यांच्याशी शेलार यांचा साध्या पद्धतीने विवाह पार पडला. वयाच्या तिशीत शेलार यांनी आयटीआय मधील टर्नर कोर्स पूर्ण केला. त्यानंतर काही काळ गांधी इंजिनिअरिंग येथे नोकरी केली. पहिला पगार २४० रुपये होता.

१९९९ मध्ये हारातील पैसे जमवून, घरातील सोने गहाण ठेवत दीड लाख रुपये किमतीचे पहिले मशिन विकत घेतले व भाडेतत्वावर छोटे वर्कशॉप टाकले. प्रचंड मेहनती शेलार यांची काही काळातच प्रगती झाली. सुरवातीच्या काळात कर्ज फेडावे म्हणून शेलार यांनी १६-१६ तास काम केले. त्यांना एलॲडटी व गोदरेज कंपनीला सुटे भाग बनवून देण्याचे काम मिळाले.

शेलार कुटुंबीयांचे नशीब उजळले

सध्या पोपटराव शेलार यांचा एस व्ही मेकॅनिकल समूह आहे. या कंपनीचे अंबरनाथ व एमआयडीसी रबाले व येथे दोन प्रकल्प आहेत. यापैकी एक प्रकल्प मुलगा हरीष चालवत आहे. अद्ययावत मशिन असून या कंपनीची उलाढाल कोट्यावधी रुपयांची आहे. कंपनीच्या माध्यमातून अनेकांसाठी रोजगाराच्या वाटा उपलब्ध करून दिल्या आहेत. कंपनीला चांगल्या कामाबद्दल

पुरस्कार मिळाले आहेत .सामाजिक काम म्हणून शेलार यांच्या यांनी नुकताच आईच्या स्मरणार्थ देलवडी येथे गावाला मोफत रुग्णवाहिका दिली आहे. तसेच शेलार कुटुंबीयांच्या वतीने दरवर्षी पाच रुग्णांच्या मूत्रपिंड शस्त्रक्रियेचा खर्च उचलला जातो. पुणे येथील सौ. प्रतिभा पवार विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपयाचे शालेय साहित्य वाटप केले.

आयुष्यात गरीबी व सर्वात चांगला काळही अनुभवला आहे. त्यामुळे प्रगतीच्या पायऱ्या चढत असलो तरी पाय जमिनीवरच आहेत. भविष्यात देलवडी व समाजासाठी अधिकाधिक काम करण्याचा विचार आहे.

- पोपटराव शेलार, उद्योजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.