पुणे ः पुण्यात अनेक स्टार्टअप कंपन्या काम करत आहेत. भांडवलाच्या कमतरतेमुळे काहींना स्वतंत्र जागा घेणे परवडत नाही, तर काही जण फ्रिलान्स म्हणून काम करतात. त्यांनाही एकट्याच्या कामासाठी म्हणून जागेमध्ये पैसे गुंतवणे शक्य होत नाही. या सर्वांच्या सोयीसाठी "को-वर्किंग स्पेस' ही संकल्पना उपनगरांत रुजू लागली आहे.
शहरात चार ते पाच वर्षांत को-वर्किंग स्पेस कंपनीचा विस्तार वाढत आहे. पूर्वी आयटी कंपनीच्या आजूबाजूच्या बाणेर, बालेवाडी आणि डेक्कन या परिसरात को-वर्किंग स्पेसची संख्या जास्त होती, ती आता वानवडी, कोरेगाव पार्क, हडपसर, कोंढवा, मगरपट्टा, खराडी व इतर उपनगरांमध्ये याचे जाळे पसरत आहे. रोज, दर महिना आणि वार्षिक अशा विविध पॅकेजमध्ये या स्पेससाठी पैसे आकारले जातात. ही किंमत महिन्याला साधारण पाच ते सात हजारांपासून सुरुवात होते.
या संकल्पनेअंतर्गत त्या व्यक्तीला किंवा कंपनीला टेबल-खुर्ची, चोवीस तास इंटरनेट सुविधा, चहा-पाणी, नाश्त्याची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली असते, तसेच स्कॅनर-प्रिंटरची सोय, मीटिंग रूम अशा सोयीसुविधा देण्यात येतात. शिवाय प्रत्येक ग्राहकांच्या मागणीनुसार इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात.
व्यवसायाने सीए असलेल्या निशांत सोमाणी यांनी कोरेगाव पार्क येथील मोकळ्या बंगल्यात को-वर्किंग स्पेसच्या माध्यमातून आपले स्टार्ट अप सुरू केले आहे. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले, की पुण्यात स्टार्ट अप कल्चर वाढत आहे. प्रत्येकाला आपल्या ऑफिससाठी जागा घेणे, त्याची देखभाल करणे शक्य नसते. त्यामुळे व्यवसायाचे काम करण्यासाठी लागणारी जागा आणि मूलभूत सोयीसुविधा आम्ही देतो. सध्या आमच्या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या, सोशल मीडियामध्ये काम करणारे फ्रीलान्स, इतर व्यक्ती या सुविधेचा लाभ घेत आहेत.
डीईएफ सेंटरचे संस्थापक सागर अग्रवाल यांनी सांगितले, की आमच्याकडे विशेष करून कला, फोटोग्राफी, मेकअप आर्टिस्ट, सोशल मीडिया मॅनेजर यांच्यासाठी विविध पॅकेज आहेत. नेटवर्किंग आणि मार्केटिंग अशा सुविधांसह काहींना जीएसटी नंबर, अधिकृत बिल, कार्यालयीन पत्ता अशा सुविधाही उपलब्ध करून देतो.
इन्स्केप को-वर्किंग स्पेस येथे "फाइव्ह एएम' क्लब सुरू केला आहे. यामध्ये लेखक, गायक, चित्रकार आदींसह ज्यांना स्वतःचा छंद जोपासायला जागा हवी, अशा सर्वांना या संधीचा फायदा घेता येतो. पहाटे पाचपासून सकाळी दहा वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये चहा, कॉफी, इंटरनेट, योगासह इतर सुविधा मिळतात.
""मी संशोधक म्हणून पुण्यात काम करते. यासाठी शांत जागा शोधत असताना कोरेगाव पार्कमध्ये इन्स्केप को-वर्किंग स्पेसविषयी माहिती मिळाली. मला निसर्ग आणि शुद्ध वातावरण असलेली जागा हवी होती. येथे निसर्गाच्या सान्निध्यात काम करताना आजूबाजूला दिवसभर अनेक पक्षांचा किलबिलाट सुरू असतो. यामुळे काम करताना आनंद मिळतो. कमी किमतीत सुविधापण मिळतात. त्यामुळे को-वर्किंग स्पेस ही कल्पना फार आवडली.'' -केल्सी मॅकविल्यम्स, अमेरिकन संशोधक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.