पुणे - अभियांत्रिकी क्षेत्रातील वाढती मागणी, त्यातही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये करिअरचे असणारे सर्वाधिक पर्याय विचारात घेऊन लाखो विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमात पदवी करण्याचा पर्याय निवडत असल्याची माहिती समोर येत आहे. बारावीनंतर अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अभियांत्रिकी आणि त्याखालोखाल औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाला पसंती देत आहेत. तर विद्यार्थ्यांकडून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी मोठ्या पगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या एमबीए अभ्यासक्रमांना विशेष प्राधान्य दिले जात आहे.
उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. सध्या सीईटी सेलमार्फत संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेत मागील वर्षाच्या तुलनेत यंदा औषधनिर्माणशास्त्र आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी कमी प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे.
दरवर्षी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी याबरोबरच आर्किटेक्चर, विधी, हॉटेल मॅनेजमेंट अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि ‘सीईटी’च्या गुणांच्या आधारेच अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. यंदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या (बी.ई/बी.टेक) प्रवेशासाठी एक लाख २९ हजार ६७० अशा सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्या पाठोपाठ औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्म) पदवी अभ्यासक्रमासाठी ८२ हजार ४८ विद्यार्थ्यांची, तर एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांसाठी ७० हजार ८७८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला (डीएसई) प्रवेश घेण्यासाठी तब्बल ७६ हजार ३३६, तर फार्मसीच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश (डीएसपी) घेण्यासाठी १५ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
१,२९,६७० - बी.ई./बी.टेक
८२,०४८ - बी. फार्म
७०,८७८ - एमबीए/एमएमएस
१६,१३८ - एमसीए
६६ एम-एचएमसीटी
७,०८० - एम.फार्म
५,४६२ - एमई/एम.टेक
७,७७८ - बी.आर्च
७६,३३६ - डीएसई
१५,४८४ - डीएसपी
५५ डीएस-एमएमसीटी
अभियांत्रिकी, एमबीएकडे वळण्याची कारणे
करिअरच्या उपलब्ध संधी सर्वाधिक
शिक्षणानंतर नोकरीची जास्त खात्री
मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळणे
महाविद्यालयातंर्गत ‘प्लेसमेंट’मधून निवडी शक्यता
परदेशात जाण्याच्या सर्वाधिक संधी उपलब्ध
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक नोंदणी झाली आहे. त्यातही विद्यार्थ्यांचा कल हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेकडे सर्वाधिक आहे. त्यामुळे यंदा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेचा कट ऑफ तुलनेने सर्वाधिक वाढण्याची शक्यता आहे. यातही राज्यातील नामांकित महाविद्यालयात या शाखेच्या प्रवेशासाठी ९९ पर्सेंटाईल असणाऱ्यांनाच प्राधान्य मिळेल. त्यामुळे नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चढा-ओढ पाहायला मिळेल.
- केदार टाकळकर, करिअर समुपदेशक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.