पुणे - पंतप्रधान आवास योजनेतून आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील नागरिकांसाठी पुणे महापालिकेतर्फे शहरात सुरू असलेल्या पाच प्रकल्पांमधील दोन हजार ९१८ घरांचे काम सुरू आहे. या घरांचा ताबा नागरिकांना मार्च महिन्यात दिला जाणार होता, त्यानंतर १५ मे नवीन तारीख सांगण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी बरेच काम शिल्लक असल्याने घराचा ताबा लवकर मिळत नाही. उलट दरवेळी नव्या तारखा प्रशासनाकडून जाहीर केल्या जात आहेत. एकीकडे घराचे भाडे, दुसरीकडे गृह कर्जाचे हप्ते अशा दुहेरी खर्चामुळे नागरिकांची आर्थिक कोंडी झाली आहे.
सर्व सामान्य नागरिकांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे योजना सुरू केल्या आहेत. त्याच्या माध्यमातून महापालिकेने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी कमी किमतीमध्ये फ्लॅट उपलब्ध करून देण्यासाठी वडगाव बुद्रुक, खराडी येथे प्रत्येकी एक तर हडपसर येथे तीन प्रकल्प सुरू केले आहेत. या पाच ठिकाणी मिळून एकूण २९०० फ्लॅट तयार होत असून, त्याचे लाभार्थी लॉटरी काढून ठरविण्यात आले आहेत.
या योजनेतील लाभार्थ्यांना ३३० चौरस फुटांचे घर मिळणार असून, त्याची एकूण किंमत ११ लाख रुपये आहे. त्यापैकी अडीच लाख रुपये सरकारकडून अनुदान प्राप्त झाले आहेत. उर्वरित रकमेसाठी नागरिकांनी कर्ज काढलेले आहे. या गृहप्रकल्पात मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प, उद्यान, सोलार, अग्निशामक यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा मिळणार आहेत.
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार नागरिकांना मार्च २०२३ मध्ये घराचा ताबा मिळणार होता, पण कामे रेंगाळल्याने १५ मेपर्यंत काही जणांना घरे देऊ अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, ही मुदत उलटून गेल्यानंतर या पाचही ठिकाणी कामे सुरू आहेत. उद्यान, एसटीपी, सीमा भिंत याची कामे रखडली आहेत. तर इमारतीला आतल्या बाजूने रंगकाम केलेले नाही. फरशी बसविणे, स्नानगृह, स्वच्छता गृह, स्वयंपाकाचा ओटा याची कामेही अर्धवट आहेत.
असा बसतोय फटका
कोरोनाच्या काळात २०२० मध्ये नागरिकांनी घराची नोंदणी केली. त्यांच्यासोबत महापालिकेने करार केल्यानंतर कर्जाचे हप्ते सुरू झालेले आहेत. दरम्यानच्या काळात रेपो रेट वाढल्याने गृह कर्जाचे व्याजदरही वाढल्याने हप्त्याची रक्कम वाढली आहे; तर दुसरीकडे घरभाडे, दैनंदिन खर्च वाढल्याने दोन्ही बाजू सांभाळताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मार्च महिन्यात घर मिळेल असे महापालिकेकडून सांगितले जात होते. साइटवर अजून अनेक कामे शिल्लक आहेत. प्रशासनाने उर्वरित कामे पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी आम्हाला घरे द्यावीत. कर्जाचा हप्ता, घर खर्च यासह इतर खर्चात वाढ होत असताना घराचा ताबा मिळाल्याने घरभाड्यातून दिलासा मिळेल.
- आशा गायकवाड, लाभार्थी
पंतप्रधान आवास योजनेचे काम शेवटच्या टप्प्यात आलेले आहे. रेराकडे केलेल्या नोंदणीनुसार डिसेंबरपर्यंत मुदत आहे. पण नागरिकांची मागणी असल्याने आम्ही ही घरे लवकर देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ठेकेदारास लवकर काम करण्याचे आदेश दिले आहे.
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.