सारथी, बार्टी आणि महाज्योती यांच्यासाठी प्रत्येकी २५० कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
पुणे - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), (Sarathi) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) (Barti) आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) (Mahajyoti) यांच्यासाठी प्रत्येकी २५० कोटी रुपयांची अर्थसंकल्पात (Budget) तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे मराठा, अनुसूचित जाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीसह विकासाच्या प्रलंबित योजना मार्गी लागणार आहेत.
महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागणार - धम्मज्योती गजभिये
‘बार्टी’चे महासंचालक धम्मज्योती गजभिये म्हणाले, ‘‘इयत्ता दहावीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण आणि पालकांचे उत्पन्न अडीच लाखांहून कमी असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षांत व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. ‘बार्टी’कडून ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत असून, या निधीमुळे योजना मार्गी लागेल. एमपीएससी स्पर्धा परीक्षेची केंद्रे वाढविण्यात येणार असून, दिल्लीत युपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढविणे शक्य होणार आहे.’’
२० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती - अशोक काकडे
‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे म्हणाले, अर्थसंकल्पातील निधीच्या तरतुदीमुळे पीएच.डी. फेलोशिप, यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच कौशल्य विकास योजनेसाठी निधी उपलब्ध होईल. केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. पुण्यातील आगरकर इन्स्टिट्यूटजवळ ‘सारथी’चे मुख्यालय उभारण्यात येणार आहे. या इमारतीसाठी सुमारे ३७ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. तसेच, कोल्हापूर, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयासाठी जागा खरेदी करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत.
वंचित घटकांना उभारी मिळणार - दिवाकर गमे
‘महाज्योती’चे संचालक प्रा. दिवाकर गमे म्हणाले, ‘महाज्योती’साठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे वंचित घटकांना उभारी मिळणार आहे. नागपूरसह सहा महसूल विभागामध्ये उपकेंद्र सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येकी पाच एकर जागा घेण्यात येणार आहे. ही केंद्रे ऑनलाइन पद्धतीने एकमेकांना जोडली जाणार आहेत.
ही जागतिक दर्जाची डिजिटल केंद्रे असतील. ‘महाज्योती’कडून स्पर्धा मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. नायगाव येथे मुलींसाठी पूर्व प्रशिक्षण नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी उभारली जाणार आहे. विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि महिलांसाठी ‘महाज्योती’ काम करणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.