PSI Exam Result : खडतर परिस्थितीवर मात करीत गाठले ध्येय; अजिंक्य बनला वनपुरीचा पहिला पोलिस उपनिरीक्षक

कौटुंबिक मतभेद झाल्याने एक वर्षाचे चिमुकले बाळ घेऊन आईने पतीचे घर सोडत माहेरचा रस्ता धरला.
PSI Ajinkya Jaunjal
PSI Ajinkya Jaunjalsakal
Updated on

गराडे - कौटुंबिक मतभेद झाल्याने एक वर्षाचे चिमुकले बाळ घेऊन आईने पतीचे घर सोडत माहेरचा रस्ता धरला. माहेरला आल्यानंतर आजी, आजोबा, दोन मामा आणि मामी यांनीही या चिमुकल्याचा सांभाळ केला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणानंतर तो महाविद्यालयात असताना त्याच्या आजोबांचे निधन झाले. काही काळाने आईच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली.

ज्या मामाकडे वास्तव्य होते त्यापैकी मोठे मामा प्रकाश जगताप यांचेही निधन झाले. मात्र, अशा परिस्थितीत स्वतःचे दुखः सावरत मोठ्या मामीने भाच्याला आधार देण्याचा निर्णय घेतला. ‘मला मूल नाही म्हणून काय झाले, तुलाच माझ्या मुलाप्रमाणे वाढविणार’ असा निश्‍चय करून मोठ्या मामी कविता जगताप यांनी त्याचे शिक्षण पुढे ठेवण्यास चालना दिली, तर लहान मामा सुनील जगताप व मामी राणी जगताप यांनीही त्यास मोठा आधार दिला.

त्याच मुलाने म्हणजेच अजिंक्य जौंजाळ याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत सर्वांचे पांग फेडले. एवढेच नाही तर संपूर्ण गावातून प्रथम पोलिस अधिकारी होण्याचा बहुमान मिळविला.

बाबुर्डी (ता. श्रीगोंदा) हे अजिंक्यचे मूळगाव. वडील एसटी खात्यात वाहक म्हणून काम करीत असल्याने पुणे येथे राहत होते. दोन मुले झाल्यानंतर घरात कौटुंबिक वाद सुरू झाले. परिणामी आई कविता जौंजाळ यांनी एक वर्षाच्या अजिंक्यला घेऊन पुरंदर तालुक्यातील वनपुरी माहेर गाठले. लहान मुलीला मात्र तिथेच ठेवून घेतल्याने तिला आणता आले नाही.

अजिंक्यचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण वनपुरी येथे झाले. दहावीला तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सासवडच्या वाघिरे कॉलेजमध्ये पूर्ण केले. यानंतर त्याने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी बारावीनंतर एक पेपर दिला. त्यावेळी ही परीक्षा अवघड असल्याने आपल्याला जमणार नाही असे वाटले होते, परंतु कोणत्याही परिस्थितीत यश मिळविण्याचा त्याने निर्धार केला.

अजिंक्यचे पालनपोषण करण्यासाठी त्याच्या आईने सासवडमधील खासगी रुग्णालयात अनेक वर्षे काम केले. दरम्यानच्या काळात आजोबांचे निधन, कोरोनाच्या काळात आईच्या पायाची शस्त्रक्रिया आणि काही दिवसांतच मोठ्या मामाचे निधन झाल्याने घरातील कमावती व्यक्ती गेली. कुटुंबासमोर आर्थिक प्रश्न उभा राहिला.

त्यामुळे खासगी शिकवणी लावणे किंवा महागडी पुस्तके विकत घेणे अवघड असल्याने अभ्यासिकेतील पुस्तकांवरच भर देत परीक्षेचा अभ्यास केला. प्रथम दोन प्रयत्नांत त्याला अपयश आले, परंतु खचून न जाता पुन्हा जोमाने अभ्यास केला आणि तिसऱ्या प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत आपले ध्येय गाठले.

त्याच्या या कामगिरीसाठी संपूर्ण वनपुरी गावाने त्याचे अभिनंदन करून गुलाल उधळीत त्याची परिसरातून मिरवणूक काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.