PSI Exam Result : मेंढरं वळताना समजलं पोरगं फौजदार झालं; मेंढपाळाच्या मुलाने ‘पीएसआय’पदाला घातली गवसणी

मेंढपाळाचा मुलगा संदीप आनंदा कोकरे याने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत ‘पीएसआय'पदाला गवसणी घातली.
sandip kokare
sandip kokaresakal
Updated on

केडगाव - देऊळगाव गाडा (ता. दौंड) येथील मेंढपाळाचा मुलगा संदीप आनंदा कोकरे याने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत ‘पीएसआय'पदाला गवसणी घातली. या गावातील स्पर्धा परीक्षेत यश मिळवणारा संदीप हा सहावा युवक ठरला आहे. शालेय जीवनातील सुट्टीत मेंढ्या वळणाऱ्या संदीप याच्या यशाचे परिसरात कौतुक होत आहे.

वडील आनंदा कोकरे व आई चांगुणा निरक्षर आहेत, पण त्यांनी संदीपला ‘बकऱ्याचा व्यवसाय अलीकडे फार कठीण झाला आहे. तू शाळा शिक’ असा सतत सल्ला दिला. लोकसेवा आयोग, पीएसआय या शब्दांचा कसलाही गंध त्यांना नाही. निकाल लागला तेव्हा आनंदा व चांगुणाबाई बकऱ्यामागे होते.

पण, निकालानंतर धनगरवाड्यात लोकांची रीघ लागली. लोकांच्या चर्चेतून त्यांना समजले की आपला पोरानं मोठी बाजी मारली असून, तो आता मोठा साहेब झाला आहे. संदीप फौजदार झाल्याचा धनगरवाड्यात आनंदाला पारावार राहिला नाही. निकालानंतर संदीप तीन दिवसांनी घरी आला. बापाला मिठी मारली अन् बापाचा अश्रूंचा बांध फुटला. आईने लेकाचे मटा मटा मुके घेतले.

संदीप ‘एनटी’मधून राज्यात नववा आला आहे. त्याचे शिक्षण न्हावरे (ता. शिरूर) येथील मल्लिकार्जुन विद्यालयात, तर उच्च शिक्षण वरवंड येथील एकनाथ दिवेकर महाविद्यालयात झाले. संदीपने चौथ्या प्रयत्नात यश मिळवले. त्याचा तिसरा प्रयत्न पाव गुणाने हुकला, तेव्हा तो खूप निराश झाला. त्याने पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरवात केली. कोणत्याही क्लासशिवाय त्याने हे यश मिळवले.

देऊळगाव गाडा येथील महेश शितोळे (तहसीलदार), सुनील जाधव (पीएसआय), आरती पवार (डीवायएसपी), विकास जाधव (विक्रीकर निरीक्षक), रश्मी शितोळे (यूपीएससी), संदीप कोकरे (पीएसआय), या सहा जणांनी स्पर्धा परीक्षांत आपला झेंडा रोवला आहे.

संदीपने यशाचे श्रेय मामा, आजी अन् भावाला दिले आहे. तो म्हणतो, ‘‘मामा म्हस्कू तांबे, रामभाऊ तांबे, संजय तांबे यांनी माझ्या शिक्षणाचा पाया घातला, तर भाऊ उमेश यांनी कळस चढविला. मला प्रत्येक गोष्ट त्याने पुरवली. पहिल्या तीन प्रयत्नात अपयश आले तेव्हा अनेक जण उमेश याला नकारात्मक बोलले. पण, त्याला माझ्यावर विश्वास होता. त्याच्यामुळे मला हे यश मिळाले. त्याशिवाय मी शून्य आहे. तो नाय तर मी नाय.

- संदीप कोकरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.