पुणे : तब्बल २१ महिन्यांनंतर पहिली ते सातवीचे विद्यार्थी आले शाळेत

शहरात पहिली ते सातवीपासूनचे वर्ग तब्बल २१ महिन्यांनंतर गुरुवारपासून सुरू झाले आहेत.
schools
schoolssakal
Updated on

पुणे : ढोल-ताशांचा गजर... रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या... शिक्षकांकडून होणारे औक्षण अशा मंगलमय वातावरणात इयत्ता पहिलीपासून सातवीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शहरात पहिली ते सातवीपासूनचे वर्ग तब्बल २१ महिन्यांनंतर गुरुवारपासून सुरू झाले आहेत. सध्या पहिली आणि दुसरीत असणाऱ्या आणि आतापर्यंत ऑनलाइनद्वारे धडे गिरविणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांनी गुरुवारी पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवले.

ऑक्टोबर महिन्यापासून शहरात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. दिवाळीनंतर पहिलीपासूनच्या शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी होत होती. परंतु, दिवाळीनंतर कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या प्रकारामुळे शाळा सुरू होणार का नाहीत, यावर प्रश्नचिन्ह होते. त्यानंतर राज्य सरकारने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याला मान्यता दिली. त्यानुसार महापालिकेने १६ डिसेंबरपासून शहरातील पहिलीपासूनच्या शाळा गुरुवारपासून सुरू करण्याला हिरवा कंदील दाखविला. त्याप्रमाणे शहरातील अनेक शाळांचे प्रवेशद्वार विद्यार्थ्यांसाठी गुरुवारपासून खुले झाले.

भय इथले संपत नाही...

दीड वर्षापासून विद्यार्थी घरातून ऑनलाइन शिक्षण घेत असल्याने पालकही चिंतेत होते. दिवाळीनंतर पहिलीपासूनचे वर्ग भरण्याची चर्चा सुरू झाली आणि पालकांकडूनही त्याला सहमती येत होती. परंतु कोरोनाचा नवा ‘ओमिक्रॉन’ हा प्रकार आला आणि पालकांची धास्ती वाढली. शाळा सुरू कराव्यात की नाही म्हणता, म्हणता राज्य सरकारने आणि त्या पाठोपाठ महापालिकेने पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याला परवानगी दिली. एकीकडे ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांना फारसा रस उरलेला नाही, परिणामी विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे तर दुसरीकडे शाळेत पाठवले तर कोरोनाचा संसर्ग मुलांना होणार नाही ना, अशा चिंतेने पालक ग्रासले आहेत.

त्यामुळे पहिलीपासूनचे वर्ग गुरुवारपासून सुरू झाले असले तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती ३० ते ४० टक्के असल्याचे निरीक्षण मुख्याध्यापक नोंदवीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये आरोग्याविषयक करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पालकांना पुरेपुर माहिती दिली जात आहे. मुलांना शाळेत पाठवावे, यासाठी शिक्षकांमार्फत पालकांना प्रोत्साहन दिले जात आहे.शहरात पहिलीपासूनच्या जवळपास ६० ते ७० टक्के शाळा पहिल्या दिवसापासून भरलेल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांची हजेरी ३० ते ४० टक्के इतकी असल्याचे निदर्शनास आले. कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. परंतु लवकरच हे वातावरण निवळेल आणि शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढेल.

मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांचे शाळांमार्फत प्रबोधन केले जात आहे.

- शांताराम पोखरकर,

सचिव, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ

शाळा सुरू होताना नोंदविलेले निरीक्षणे

१) विद्यार्थ्यांसाठी उघडले शाळांचे प्रवेशद्वार

२) विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये रांगोळीच्या पायघड्या, फुले-मिठाईचे वाटप

३) शिक्षकांनी केले विद्यार्थ्यांचे औक्षण

४) इयत्ता पहिलीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा डिसेंबरमध्ये पहिला ‘शाळा प्रवेश’

५) इयत्ता दुसरीत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच चढली शाळेची पायरी

६) तब्बल २१ महिन्यांनंतर शिक्षक-विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट

शाळांनी केले विद्यार्थ्यांचे ‘स्वागत’

खराडी येथील सुंदरबाई मराठे विद्यालयात (प्राथमिक) पहिल्याच दिवशी ७० टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांचे औक्षण करून ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रशांत डाळिंबकर, संजय सोमवंशी उपस्थित होते. नवीन मराठी शाळेत रांगोळ्या काढून फुग्यांची कमान करण्यात आली होती. मुलांच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या.

मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले. शिक्षक धनंजय तळपे, तनुजा तिकोने यांनी विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर आणि खाऊ वाटप केले. सदाशिव पेठेतील मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. आरोग्याविषयक आवश्यक त्या उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे शाळेत औक्षण करून स्वागत करण्यात आले. भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रशालेच्या प्राचार्या उज्ज्वला पिंगळे, उपमुख्याध्यापिका अंजनी गानू, पर्यवेक्षक उदय महिंद्रकर आदी यावेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()