पुणे - आगामी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आयोजित करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी (ता. २३) पुण्यात झालेल्या बैठकीत निमंत्रण आलेल्या चार स्थळांमधून या स्थळाची निवड करण्यात आली. त्यामुळे आता सुमारे ७० वर्षांनंतर साने गुरुजींच्या या कर्मभूमीत सारस्वतांचा मेळा भरणार आहे.
वर्धा येथील ९६ वे संमेलन संपून अवघे दोन महिने झाले असताना आगामी संमेलनाचे स्थळही निश्चित झाले आहे. ९७ व्या संमेलनासाठी महामंडळाला चार निमंत्रणे प्राप्त झाली होती. यामध्ये सातारा, औदुंबर, अंमळनेर आणि जालना या चार स्थळांचा समावेश होता.
संमेलनाच्या स्थळ निवड समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली, तर सातारा येथील संस्थेचे दृकश्राव्य सादरीकरण पाहिले. तीनही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी व कार्यक्षमता यांचा विचार करून समितीने सर्वानुमते मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली आणि महामंडळाने त्याला मान्यता दिली.
स्थळ निवड समितीमध्ये साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, उपाध्यक्ष रमेश बंसकर तसेच प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक यांचा समावेश होता.
पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. याप्रसंगी प्रकाश पागे, प्रा. मिलिंद जोशी, जे. जे. कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डॉ. विद्या देवधर, अ. के. आकरे व प्रकाश गर्गे हे सदस्य उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.