Old Pune Nashik Highway: जुन्या पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे (ता.आंबेगाव) येथे घोड नदीच्या पुलाच्या दक्षिण दिशेला शनिवारी (ता.२२) रात्री साडेनऊच्या सुमारास फॉर्च्यूनर गाडीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ओम उर्फ बंटी सुनील भालेराव (वय २०) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.
याप्रकरणी मंचर पोलिसांनी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर साहेबराव मोहीते (रा.मोहीतेवाडी शेलपिंपळगाव ता.खेड) याला ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यासह देशभरात कल्याणी नगर अपघात प्रकरण गाजले. भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर एकलहरे येथे घडलेल्या घटनेमुळे नागरिक संतप्त होऊन मंचर पोलीस ठाण्यावर गेले होते.
आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर जमाव तेथून निघून गेला. ओमचे चुलते नितीन रामचंद्र भालेराव (रा.कळंब-सहाणेमळा ता.आंबेगाव) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शनिवारी रात्री कळंब गावातून जुन्या रस्त्याने मंचरच्या दिशेने भरधाव फॉर्च्यूनर (एम.एच.१४ के.जे.७५५७) गाडी येत होती. पिकअपला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने घरी जात असलेल्या ओमच्या दुचाकीला फॉर्च्यूनरने धडक दिली.
त्यामुळे ओम रस्त्यापासून दहा ते बारा फुट फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरु झाला. तसेच डावा डोळा, तोंडाला, ओटांवर व हनवटीला गंभीर दुखापत झाली.
जखमीला शुभम भालेराव, सचिन वायाळ, शैलेश भालेराव यांच्यासह स्थानिक नागरिकांनी रुग्णावाहिकेतून मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातानंतर मयूर मोहिते यांनी मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला. असा गावकऱ्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे गावकरी संतप्त झाले होते.
रविवारी (ता.२३) सकाळी कळंब येथे ओम या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ओमच्या मागे आई, वडील, बहिण असा परिवार आहे. ओम हा भालेराव कुटुंबातील एकलुता एक मुलगा होता. सदर घटनेमुळे कळंब गावांवर शोककळा पसरली आहे.
दरम्यान खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस हवालदार संतोष मांडवे पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.