Pune Accident - आभाळंच फाटलेले असेल तर त्याला ठिगळ कुठेकुठे लावणार? पुण्यातील वाहतूक व्यवस्थेची अवस्था काहीशी अशीच आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी चांदणी चौकातील प्रकल्पाचे उद्घाटन केले.
त्यामुळे या भागातील कोंडी कमी होईल अशी आशा आहे. पण कात्रज-कोंढवा रस्ता अधिक भीषण झाला आहे. या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.
विद्यापीठ रोड, आरटीओ चौक, नगररोड, अशी ठिक ठिकाणी शहरात वाहतूक कोंडीची आणि अपघाताची बेटे तयार झाली आहेत.
त्यामुळे वाहतूक नियोजनासाठी एकात्मिक विचारच करावा लागणार आहे.कात्रज परिसरात वास्तव्याला असणारे एक पालक प्रचंड उद्विग्न झाले होते. त्यांनी मुलीचा कोंढवा भागातील एका नामांकित शाळेतील प्रवेश रद्द करून शहरातील एका शाळेत निश्चित केला होता. गुरुवारी कात्रज कोंढवा रस्त्यावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला.
या अपघातात सहा सात वाहनांना धडक बसली. या अपघातात शाळेच्या बसला धक्का बसला पण सुदैवाने विद्यार्थ्यांना काही झाले नाही.
"या रस्त्यावर गेल्या सहा -सात वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. जर खड्डे बुजविण्याचीही लायकी प्रशासनाची नसेल तर मुलांचा जीव धोक्यात कसा घालणार? रोज भीती वाटते त्यामुळे शाळाच बदलायचा आम्ही निर्णय घेतला.
नागरिक षंढ आहेत, प्रशासन ठिम्म आहे , लोकप्रतिनिधी निर्लज्ज आहेत, त्यामुळे काहीही बदल होणार नाही." हा संताप फक्त त्या एका पालकाचा नाही तर या परिसरात राहणाऱ्या लाखो पुणेकरांचा आहे. या रस्त्यावर गेल्या दोन तीन वर्षांत प्रचंड जड वाहतूक वाढली आहे. मोठमोठे मालवाहतूक ट्रक, मोठे कंटेनर, डंपर यांची २४ तास वाहतूक सुरू असते.
रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली, रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरी वस्ती वाढली पण रस्त्याची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट झाली. हा रस्ता रुंद झाला नाही. बाळासाहेब शिवरकर हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री असताना रस्ते विकास महामंडळाकडून या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय झाला,
पण केवळ घाणेरड्या राजकारणाची सवय लागलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी या रस्त्याच्या कामात खोडा घातला. त्यानंतर या रस्त्याबाबत वेळोवेळी घोषणा झाल्या, निधी मंजूर झाला पण एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या सवयीने भूसंपादन होऊ शकले नाही.
आजही या परिसरातील लोकप्रतिनिधी केवळ राजकारण करण्यात गुंग आहेत. पण येत्या महापालिका निवडणुकीत नागरिकच यांना रस्त्यावर आणतील, यात शंका नाही.
गेल्या पाच वर्षात या रस्त्यावर ३८ भीषण अपघात झाले यात २४ निष्पाप लोकांचा बळी गेला. अपघातात जखमी झालेल्यांची, अपंगत्व आलेल्यांची संख्या मोठी आहे. सध्या या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. ते बुजविण्याची तसदी महापालिकेने घेतली नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांकडे त्याची नोंदही होत नाही.
अशा भयावह परिस्थितीतून नागरिकांना दररोज प्रवास करावा लागत आहे. कात्रज चौकापासून खडी मशीन चौकापर्यंत दररोज सकाळ संध्याकाळी वाहतूक कोंडी झालेली असते. अत्यंत चुकीच्या आणि अशास्त्रीय पद्धतीने डिव्हायडर फक्त उभे केले आहेत, खडीमशीन चौक वगळता कोठेच वाहतूक पोलिस नसतात. जड वाहनांना कसलीच शिस्त नाही. कोंढवा, येवलेवाडी, उंड्री परिसरात अनेक शाळा आहेत.
या शाळांसाठी जाण्यासाठी स्कूल बस, रिक्षा, तसेच स्वतः दुचाकीवरून मुलांना सोडणारे पालक या रस्त्यावर प्रवास करीत असतात. कात्रज -कोंढवा रस्त्याच्या पलीकडे बोपदेव घाट, टिळेकरनगर आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता सेवा रस्ता असल्यासारखा झाला आहे.
या रस्त्यावर होत असलेली जड वाहनांची वाहतूक बंद करण्याची वेळ आली आहे किंवा रिंग रोड होत नाही तोपर्यंत तातडीने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते व्हायला हवेत. शत्रुंजय मंदिर चौकातील ग्रेट सेपरेटरचे काम संथगतीने सुरू आहे.
त्यामुळे या चौकात सतत वाहतूक कोंडी आहे. त्याकडे महापालिका किंवा पोलिस प्रशासन या कोणाचे लक्ष नाही. या परिसरातील आजी माजी लोकप्रतिनिधी केवळ सोशल मीडियावर कार्यरत असून, स्वतः ची पाठ थोपटण्यातच मग्न आहेत. त्यामुळे नागरिकांना वाली कोण हा प्रश्न आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या प्रयत्नातून कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, पण रस्त्यांचे काम महापालिकेकडे असल्याने त्यात कोणताही सुधारणा होत नाही. आता वाहने चांदणी चौकात अडकणार नाहीत पण पुढे वारजे पूल, नवले पुल, कात्रज चौक असे कोंडीचे नवे स्पॉट तयार झाले आहेत.
त्यावर वेळीच मार्ग काढण्याची गरज आहे. ज्या ठेकदारांकडे रस्त्यांचे काम दिले त्यांच्यावर कडक कारवाई करायला हवी. ज्याच्या घरातील व्यक्ती अपघातात जाते, त्या कुटुंबालाच व्यक्ती जाणे म्हणजे काय असते, हे समजते.
त्यामुळे आतातरी प्रशासन, लोकप्रतिनिधी या संपूर्ण प्रश्नांबद्दल गंभीर होतील आणि रस्त्याच्या कामाचे, सेवा रस्त्यांचे, जड वाहतुकीचे नियोजन करतील अशी अपेक्षा आहे. नाहीतर आभाळाला लावलेली ठिगळं पुन्हा फाटणारचं.
हे नक्की करा
- कात्रज कोंढवा रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा.
- ज्या ठेकदाराने गेल्यावर्षी रस्त्याचे डांबरीकरण केले त्यावर कारवाई
- भूसंपादनाची कार्यवाही तातडीने करणे
- वाहतूक पोलिसांकडून तातडीने वाहतूक नियमनासाठी कार्यवाही
- जड वाहतूक विशिष्ट वेळेत बंद करणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.