कात्रज : अखिल भारतीय मराठा महासंघाकडून पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी व कर्मचारी, आडत्यांवर दाखल करण्यात आलेला ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा रद्द करणेबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. त्याचबरोबर, अधिकारी, कर्मचारी व आडतदार यांच्या न्यायोचित मागणीस मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा घोषित करण्याचे पत्रकदेखिल काढण्यात आले आहे.
पुणे बाजार समितीमधील फळे भाजीपाला विभागात विनापरवाना व बेकायदेशीरित्या लिंबू विक्री करणाऱ्या महिला व इतर व्यापाऱ्यांवर बाजार समिती प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात सहा महिन्यापूर्वी अतिक्रमण कारवाई केली. या कारवाईत बाजार समितीने केलेल्या चित्रीकरणात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडलेला नाही,
असे असताना मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये तत्कालीन प्रशासक, अधिकारी, कर्मचारी व आडते यांच्यासह २० ते २५ जणांवर अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामकाज करत असताना अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार हा शासकीय अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रकार आहे. तरी वरील खोटे गुन्हे रद्द करण्याची मागणी मराठा महासंघाने केली आहे.
अशा प्रकारचे शासकीय कर्तव्य पार पाडत असताना कुठल्याही जातीपातीचा धर्माचा संबंध येत नाही आणि अशा प्रकारचा संबंध जर जाणीवपूर्वक जोडला जात असेल तर प्रशासनाला शासकीय नियम व त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना अनेक ठिकाणी जातीपातीच्या अडचणी निर्माण होतील व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. सदर कर्मचारी व अधिकाऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे पोलीस प्रशासनाने तत्काळ मागे घ्यावेत, अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.