पुणे, ता. १४ : सुखोई विमान बुधवारी (ता. १४) सराव संपवून पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना अचानक आठ ते दहा फूट उंचीवरून खाली आदळले. सुखोईचे हार्ड लँडिंग झाल्याने हवाई दलाने सुमारे ४० मिनिटांसाठी धावपट्टी बंद केली. धावपट्टीचे काही नुकसान झाले का? हे पाहण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून धावपट्टी प्रवासी विमानांसाठी बंद केली होती. यादरम्यान चार विमानांचा मार्ग बदलला; तर सात ते आठ विमानांना उशीर झाला. धावपट्टी बंद झाल्याने पुणे विमानतळाचे वेळापत्रक बिघडले होते. परिणामी प्रवाशांना फटका बसला.
पुणे विमानतळ हवाई दलाचे बेस स्टेशन आहे. त्यामुळे येथे नेहमीप्रमाणे सुखोईच्या वैमानिकाचा सराव सुरू होता. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सुखोई जमिनीवर उतरत असताना अचानक आठ ते दहा फूट उंचीवरून धावपट्टीवर आदळले. सुदैवाने लँडिंग गियरचे काही नुकसान झाले नाही; मात्र सुखोईचे वजन (१८ हजार ४०० किलो) आणि वेग (लँडिंगचा २३० किलोमीटर प्रति तास) याचा परिणाम धावपट्टीवर होऊ शकतो.
धावपट्टीचे नुकसान झाल्यास प्रवासी विमानांना लँडिंग करताना अपघाताचा धोका असतो. त्यामुळे हवाई दलाने तत्काळ ‘नोटम’ (नोटीस टू एअरमन) दिले. त्यामुळे पुणे विमानतळावरील हवाई नियंत्रण कक्षाने सर्व प्रवासी विमानांसाठी धावपट्टी एक तासासाठी बंद केली. परिणामी विमानतळाचे वेळापत्रक बिघडले.
विमानाचे हार्ड लँडिंग दोन गोष्टींमुळे होऊ शकते. वैमानिकाच्या चुकीमुळे अथवा वाऱ्याचा प्रभावामुळे. यात साधारणपणे लँडिंग गियर खुले झाल्यानंतर आठ ते दहा फूट उंचीवरून विमान धावपट्टीवर आदळल्यास टायरचे अथवा धावपट्टीचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. बुधवारच्या घटनेत तसे काही घडले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. धावपट्टीची पाहणी करण्यासाठी सुमारे ४० मिनिटांसाठी धावपट्टी बंद ठेवली होती. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी धावपट्टीची पाहणी केल्यानंतर ११ वाजून १० मिनिटांनी ‘नोटम’ हटविले. त्यानंतर प्रवासी विमाने पुणे विमानतळावर उतरण्यास सुरुवात झाली.
सुखोईचे वजन साधारणपणे १८ हजार ४०० किलो इतके आहे; तर सरासरी वेग दोन हजार ३९० किलोमीटर प्रति तास इतका आहे. याचा वेग लँडिंगवेळी सुमारे २३० किलोमीटर असतो. इतक्या वेगाने विमान खाली आदळल्यास धावपट्टीचे नुकसान होते. यात धावपट्टीवर छोटे खड्डे अथवा माती उखडली जाण्याची शक्यता असते, असे झाल्यास अन्य प्रवासी विमानांच्या टायरला धोका होऊ शकतो. त्यात विमान घसरण्यापासून ते इंजिनमध्ये छोटे दगड जाण्याची शक्यता असते. त्यामुळे विमानाचा अपघातही होऊ शकतो. त्यामुळे तत्काळ धावपट्टीचे काही नुकसान झाले आहे का? हे पाहणे अत्यंत गरजेचे असते.
१. इंडिगोचे चेन्नईहून पुण्याला येणारे विमान हैदराबादला वळविले.
२. इंडिगोचे दिल्लीहून पुण्याला येणारे विमान मुंबईला वळविले.
३. विस्ताराचे दिल्लीहून पुण्याला येणारे विमान मुंबईला वळविले.
४. एअर इंडियाचे बंगळूरहून पुण्याला येणारे विमान पुन्हा बंगळूरला परतले.
५. यासह सात ते आठ विमानांना आपल्या निर्धारित वेळेपेक्षा सुमारे एक ते दीड तासाचा उशीर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.