पुणे : क्रीडा विद्यापीठाची घोषणा केवळ कागदावरच

बालेवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची २०२०-२१ च्या राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली.
balewadi international sports university
balewadi international sports universitysakal
Updated on
Summary

बालेवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची २०२०-२१ च्या राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली.

बालेवाडी - बालेवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची २०२०-२१ च्या राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली. याद्वारे जून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन हे अभ्यासक्रम सुरू होणार होते; परंतु या विद्यापीठासाठी आवश्यक असणाऱ्या अधिकाऱ्यांची पदभरती तसेच इतर प्रक्रिया अद्यापही झाल्या नसल्याने क्रीडा विद्यापीठाची घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र आहे.

राज्य सरकार तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) म्हाळुंगे-बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाला मान्यता दिली आहे. येथे शारीरिक व क्रीडा शिक्षण, क्रीडा विज्ञान व क्रीडा वैद्यक, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यमे व संज्ञापन, क्रीडा शिकवणी व प्रशिक्षण या विषयांचे अभ्यासक्रमाचे धडे दिले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनाचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम येथे सुरू करण्यात येणार होता. प्रत्येकी ६० विद्यार्थी हे धडे गिरवणार होते.

शिवछत्रपती क्रीडा संकुलाविषयी...

  • हे संकुल १९९४ मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी बांधले गेले.

  • २००८ मधील कॉमनवेल्थ युवा स्पर्धा येथे खेळण्यात आल्या.

  • संकुलात ११ हजार ५०० आसन क्षमता आहे.

  • ॲथलेटिक्स स्टेडियम, जलतरण केंद्र, बॅडमिंटन हॉल, शूटिंग, टेनिस कोर्ट, हॉकी, फुटबॉलची एकूण तीन मैदाने आहेत.

  • मोठे पाच हॉल असल्यामुळे इतर खेळांसाठी ते वापरता येतात.

  • पुण्यातील अनेक व्यावसायिक क्लब सध्या हे स्टेडियम वापरतात.

रेंगाळलेली प्रक्रिया...

या विद्यापीठासाठी आवश्यक असणाऱ्या कुलगुरू, परीक्षा नियंत्रक, वित्त अधिकारी, मूल्यांकन संचालक, निबंधक या अधिकाऱ्यांची पदभरती राज्य शासनाकडून अद्याप झालेली नाही. तसेच विद्यापीठात आवश्यक असणारे इतर प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याही रखडल्या आहेत. ही माहिती राज्य क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली. यासंबंधी क्रीडा सचिवांशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे, असेही ते म्हणाले.

अभ्यासक्रम

क्रीडा विज्ञान

  • कालावधी : ३ वर्षे

  • पटसंख्या : ६०

  • शुल्क : समिती निश्चित करेल. निवड प्रक्रिया, शुल्क या सर्व गोष्टींची माहिती वेबसाइट वरून मिळेल.

  • शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण

क्रीडा व्यवस्थापन

  • कालावधी : ३ वर्षे

  • पटसंख्या : ६०

  • शुल्क : समिती निश्चित करेल. निवड प्रक्रिया, शुल्क या सर्व गोष्टींची माहिती वेबसाइट वरून मिळेल.

राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, पुणे या संस्थेने जगातील काही नामांकित विद्यापीठे आणि संस्थांशी याबाबतच्या करारासंदर्भात चर्चा केली असून, त्यातील लॉब्रो युनिव्हर्सिटीकडून सकारामत्क प्रतिसाद मिळाला आहे. इतर संस्थांची नावे खालीलप्रमाणे - युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलीना

  • नॉर्वेजियन स्कूल ऑफ स्पोर्टस सायन्सेस

  • युनिव्हर्सिटी ऑफ क्वीनलँड

  • युनिव्हर्सिटी ऑफ सदन, डेनमार्क

  • यॉर्क युनिव्हर्सिटी, कॅनडा

  • युनिव्हर्सिटी ऑफ कोपनहेगन, डेनमार्क

  • जर्मन स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी कलोन

  • मास्ट्रिच युनिव्हर्सिटी नेदरलँड

  • युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी

  • ओहियो युनिव्हर्सिटी

  • युनिव्हर्सिटी ऑफ साउथ फ्लोरिडा

  • डिकीन युनिव्हर्सिटी

  • जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी

  • साउथ ईस्टन ओक्लाहोमो स्टेट युनिव्हर्सिटी

आपल्या प्रतिक्रिया कळवा

बालेवाडी स्टेडियमवर होणाऱ्या क्रीडा विद्यापीठाला अद्याप मुहूर्त मिळताना दिसत नाही. रखडलेल्या प्रक्रियेबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर कळवा.

या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाची सर्व माहिती देणारी वेबसाइट तयार केली असून, यासंदर्भातील सर्व नियुक्त्या झाल्यानंतर वेबसाइट खुली करण्यात येईल. तसेच यासाठी आवश्यक विसतिगृह व भोजनालयाचे नूतनीकरणाचे कामही सुरू आहे. सध्या क्रीडा संकुलाच्या स्पोर्ट्स सायन्स या इमारतीमध्ये हे अभ्यासक्रम सुरू होतील,

- ओमप्रकाश बकोरिया, आयुक्त, राज्य क्रीडा विभाग

हे क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यापूर्वी भारतातील तसेच परदेशातील अशा विद्यापीठांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला ध्येय, उद्दिष्ट ठरविता आली असती. तसेच एवढा मोठा खर्च करून वाया जाणार नाही. त्यामुळे पूर्ण अभ्यास करून हे विद्यापीठ सुरू करावे.

- प्रताप जाधव, खजिनदार, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया

हे आंतररष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू होणे खूपच गरजेचे आहे. यामुळे खेळाडूंना खूप चांगले प्रशिक्षण तर मिळेलच, पण खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. जास्तीत जास्त मुले खेळाकडे वळतील. यामुळे खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांतील विज्ञान व व्यवस्थापनातील कुशल व्यावसायिक निर्माण होऊन क्रीडा शिक्षणात क्रांती घडेल.

- अनिल कोकाटे, क्रीडा प्रशिक्षक, ऑर्किड स्कूल

क्रीडा विद्यापीठ लवकर सुरू होणे गरजेचे आहे. कारण आपल्या देशात खेड्यापाड्यात खूप चांगले खेळाडू आहेत. फक्त मार्गदर्शनाअभावी ते पुढे येऊ शकत नाहीत. या विद्यापीठामुळे आपल्या देशातील मुलांना देशातील तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळेल. यातून क्रीडाविश्वामध्ये रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील आणि जास्तीत जास्त खेळाडू खेळाकडे वळतील.

- हेमंत बालवडकर, राष्‍ट्रीय खेळाडू, शॉट गन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.