Pune Band : भव्य मूक मोर्चा; कडकडीत बंद

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या विरोधात ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी, आम्ही उतरलो रस्त्यावर शिवरायांसाठी’ असे फलक आणि भगवा, हिरवा, निळा असे सर्वच धर्मांचे झेंड हातात घेत सर्वपक्षीय व संघटनांच्या वतीने बुधवारी शहरात मोर्चा काढण्यात आला.
Pune Band
Pune BandSakal
Updated on
Summary

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या विरोधात ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी, आम्ही उतरलो रस्त्यावर शिवरायांसाठी’ असे फलक आणि भगवा, हिरवा, निळा असे सर्वच धर्मांचे झेंड हातात घेत सर्वपक्षीय व संघटनांच्या वतीने बुधवारी शहरात मोर्चा काढण्यात आला.

पुणे - महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या विरोधात ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी, आम्ही उतरलो रस्त्यावर शिवरायांसाठी’ असे फलक आणि भगवा, हिरवा, निळा असे सर्वच धर्मांचे झेंड हातात घेत सर्वपक्षीय व संघटनांच्या वतीने बुधवारी शहरात मोर्चा काढण्यात आला. अत्यंत शिस्तीत निघालेल्या या मोर्चाला पुणेकरांनीही चांगला प्रतिसाद दिला.

राज्यपाल कोश्‍यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना तत्काळ पदावरून दूर करावे, तसेच भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी, या मागणीसाठी सर्वपक्षीयांच्या वतीने पुणे बंदची हाक देण्यात आली होती. बुधवारी सकाळी डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मूक मोर्चा काढण्यात आला.

महिलांचा लक्षणीय सहभाग

या मोर्चात राजकीय पक्षांबरोबर बावीसहून अधिक स्वयंसेवी संस्था आणि संघटना सहभागी झाल्या होत्या. तरुणांबरोबरच महिलांचा लक्षणीय सहभाग होता. हातावर आणि डोक्यावर काळ्या पट्ट्या, प्रत्येक धर्माचे झेंडे आणि मोर्चाच्या पुढील बाजूस छत्रपती शिवराय यांचा अश्वारूढ पुतळा अशा शिस्तीमध्ये निघालेल्या मोर्चा लालमहालापर्यंत आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

मंगळवारी शहरात विविध संघटनांनी पुकारलेला बंद व मूक मोर्चा शांततेत पार पडला. शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. स्थानिक पोलिस ठाण्यांच्या अडीच हजार पोलिसांनी त्यांच्या हद्दीत तर एक हजार पोलिसांनी मूक मोर्चासाठी कडक बंदोबस्त ठेवला होता. या बंदला अंदाजे ३० ते ४० टक्के प्रतिसाद मिळाल्याची शक्‍यता आहे.

- आर. राजा, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा

चौकाचौकात महाराजांचे पुतळे

मोर्चाच्या मार्गावर चौकाचौकात शिवाजी महाराजांचे पुतळे ठेवण्यात आले होते. त्याला पुष्पहार घालून मोर्चा हळू हळू पुढे सरकत होता. तर मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांसाठी पाणी आणि चहाची व्यवस्था काही व्यापारी संस्थांच्या वतीने करण्यात आली होती. मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख यांच्यासह सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

सहभागी संघटना

पुणे शहर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), आम आदमी, पुणे शहर व्यापारी संघटना, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन, संभाजी ब्रिगेड, मूलनिवासी मुस्लिम मंच, राष्ट्रसेवा समूह महाराष्ट्र, अखिल भारतीय बहुजनसेना, स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती, पदवीधर विद्यार्थी संघ, श्रीमंती घोरपडे सरकार प्रतिष्ठान, स्वराज्य भूमी प्रतिष्ठान, शिवनेरी रिक्षा संघटना, रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र, युवक क्रांती दल, शिवसंकल्प संस्था, जातीय लोकाधिकार संघटना महाराष्ट्र, पुणे शहर जिल्हा मातंग समाज, लहूजी समता परिषद, अद्वैत क्रीडा संघ, रिजनल ख्रिश्चन सोसायटी, मराठा टायगर फोर्स, राजश्री शाहू महाराज सोशल फाउंडेशन, मराठा सेवक समिती, रिपब्लिकन सेना, आजाझ समाज पार्टी, जमियते-उलमाए हिंद, दलित पँथर ऑफ इंडिया.

दुपारनंतर जनजीवन सुरळीत

‘बंद़’ दुपारी तीनपर्यंत असेल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार दुपारी तीननंतर शहरातील जनजीवन सुरळीत झाले. हॉटेल, विविध प्रकारची दुकाने सुरू झाली, तसेच पीएमपी, रिक्षा, कॅब यांचीही वाहतूक सुरू झाली. चित्रपटगृहेही सायंकाळी सुरू झाली. तसेच शहरातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही सायंकाळी गजबजले होते. मात्र, ‘बंद़’चा मूड असल्यामुळे एरवीपेक्षा रस्त्यावर गर्दी कमी दिसत होती. शहराच्या मध्यभागातील आणि उपनगरांतील जनजीवनही सायंकाळी चारनंतर सुरू झाल्याचे दिसत होते. सदाशिव पेठेतील कल्पेश ट्रेडर्सचे सचिन संघवी म्हणाले, ‘‘पुणे व्यापारी महासंघाने बंद दुपारी तीनपर्यंत असेल, असे यापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे आम्ही त्यानंतरच दुकान उघडले. पूर्वकल्पना दिल्यामुळे ग्राहकांनाही सोयीचे झाले होते. बंद हा या पद्धतीनेच असला पाहिजे. पूर्ण दिवस बंद ठेवले, तर व्यापारी आणि ग्राहकांचेही नुकसान होते.’’

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केलेले आक्षेपार्ह विधान आणि महापुरुषांबाबत राजकीय नेत्यांकडून सातत्याने होणारा अवमान याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय शिवप्रेमी, संघटना व पक्षांनी मंगळवारी पुकारलेल्या ‘पुणे बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. याबरोबरच कडक पोलिस बंदोबस्तात मूक मोर्चा तसेच शहरातील बंद शांततेत पार पडला.

मंगळवारी सकाळी वृद्धाश्रम, अनाथालये, एकाकी ज्येष्ठ नागरिक यांना आवश्‍यक दूध, ब्रेड, अंडी, फळे, खाद्यपदार्थ स्थानिक व्यावसायिकांनी सकाळीच पोहोचवून पुन्हा दुकाने बंद ठेवली, तर उर्वरित ठिकाणी बहुतांश व्यापारी, व्यावसायिकांनी बंदचा फटका बसू नये, यासाठी मंगळवारी सकाळपासूनच दुकाने न उघडण्याला प्राधान्य दिले होते. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही हेच चित्र कायम होते. बाजारपेठा, महात्मा फुले मंडई, मार्केट यार्ड अशी महत्त्वाच्या ठिकाणीही व्यापारी, व्यावसायिकांनी आपली दुकाने, गाळे व व्यवसाय बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदविला. तर नेहमी बंदच्यावेळी सुरू राहणारे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स‌, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, स्वीट होम्स, डेअरी, खानावळी अशा व्यावसायिकांनीदेखील आपले व्यवसाय बंद ठेवून बंदमध्ये आपला सहभाग नोंदविला. सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत बंद शहरात कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. दुपारी तीन वाजल्यानंतर व्यावसायिकांनी हळूहळू त्यांची दुकाने, कार्यालये, कंपन्या उघडण्यास सुरुवात केली. मात्र ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन बहुतांश व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी दुपारी तीन वाजल्यानंतरही दुकाने बंद ठेवण्यास प्राधान्य दिले.या बंदला व्यापारी, व्यावसायिकांकडून चांगला प्रतिसाद देत बंद पाळला.

पोलिसांचा कडक बंदोबस्त

शहरातील संवेदनशील ठिकाणे, वस्ती परिसर, धार्मिक स्थळे, प्रमुख व महत्त्वाचे चौक, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी, कर्मचारी ठिकठिकाणी बंदोबस्तावर होते. याबरोबरच बीट मार्शल, दामिनी पथक, तपास पथकांचे कर्मचारी यांच्याकडूनही महत्त्वाच्या ठिकाणी गस्त वाढविण्यावर भर देण्यात आला होता. स्थानिक पोलिस ठाण्यांच्या अडीच ते तीन हजार पोलिसांनी आपापल्या परिसरात बंदोबस्त केला. विशेषतः वरिष्ठ पोलिस अधिकारी स्वतः बंदोबस्तावर बारकाईने लक्ष ठेवून होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()