पुणे : बारामती वनपरिक्षेत्रात लवकरच सुरु होणार बिबट्या सफारी

आपल्या आवडत्या वाघोबाला पाहण्यासाठी राज्यातील अभयारण्यात किंवा व्याघ्र प्रकल्पांना अनेक पर्यटक भेट देतात.
Tadoba
TadobaSakal
Updated on

पुणे : आपल्या आवडत्या वाघोबाला पाहण्यासाठी राज्यातील अभयारण्यात किंवा व्याघ्र प्रकल्पांना अनेक पर्यटक भेट देतात. जंगल सफारीचा आनंद लुटतात. आता जिल्ह्यातच अशा सफारीचा आनंद पर्यटकांना मिळणार आहे, ते ही ‘बिबट्या सफारी’च्या माध्यमातून. बारामती वनपरिक्षेत्रातील गाडीखेल येथे लवकरच ‘बिबट्या सफारी’ची सुरवात होणार असून यामुळे पर्यटकांना चक्क बिबट्याच्‍या भेटीला जाण्याची संधी मिळणार आहे.

गाडीखेल या गावामधील सुमारे १०० हेक्टर वन क्षेत्रात ‘बिबट्या सफारी’ सुरू होणार असून यासाठी सुमारे ६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे राज्याच्या २०२२-२३ अर्थसंकल्पात नमूद केले आहे. आफ्रिकन सफारी किंवा गुजरात येथील सिंह सफारीबाबत अनेकांनी ऐकले असेल. त्याच धर्तीवर पुणे वनविभागाद्वारे ‘बिबट्या सफारी’चे नियोजन केले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात ‘बिबट्या सफारी’ सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात येत होती. आता प्रत्यक्षात याची सुरवात होणार असून पुणे जिल्ह्याला यामुळे नवी ओळख प्राप्त होणार आहे. या ‘बिबट्या सफारी’मुळे येथील परिसरातील स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. तसेच यातून होणाऱ्या उत्पन्नाचा वापर बिबट्यांच्या देखभालीसह संवर्धनाकरिता केला जाईल. असे वन विभागामार्फत सांगण्यात आले.

याबाबत उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले की, ‘‘जिल्ह्यात बिबट्यांचा सर्वाधिक वावर जुन्नर येथे आहे. अलीकडच्या काळात बारामती वनपरिक्षेत्र तसेच, दौंड व इंदापूर या वनपरिक्षेत्रामध्ये बिबट्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढलेले असून मानव-बिबट्या संघर्षात ही वाढ पाहायला मिळते. बिबट्यांच्या पुनर्वसन व संवर्धन याबरोबरच जनजागृतीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल.’’

वाढत्या शहरीकरणामुळे माणसाच्या वस्तीत बिबट्या आढळल्याच्या घटना जिल्ह्यात अनेकवेळा घडल्या आहेत. यामुळे माणूस-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाद्वारे समिती तयार करण्यात आली असून अनेक जनजागृती उपक्रम ही राबविण्यात येत आहेत. तसेच वाचविण्यात आलेल्या बिबट्यांना उपचार किंवा संवर्धनासाठी पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात येते. अशा बिबट्यांसाठी नैसर्गिक अधिवास विकसित करण्यात येईल. बिबट्या सफारीद्वारे अशा बिबट्यांना पाहता येणार आहे. दौंड, इंदापूर, बारामती येथील कान्हेरी वन उद्यान, मयुरेश्र्वर अभयारण्य, भादलवाडी, भिगवण पक्षी निरीक्षण केंद्र आदी परिसरामध्ये ‘इको टुरिझम सर्किट’ विकसित करण्यात येणार आहे. यामुळे पुणे वनविभागाच्या निसर्ग पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनाचे प्रयत्न अधिक बळकट होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

तीन टप्प्यात पूर्ण होणार प्रकल्प ः

हा प्रकल्प तीन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात बिबट्या सफारी केंद्र तयार करण्यात येईल. यासाठी रेस्क्यू करण्यात आलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील बिबट्यांना सफारीसाठी तयार करण्यात आलेल्या अधिवासात ठेवले जाईल. दुसऱ्या टप्प्यात टायगर सफारी आणि तिसऱ्या टप्प्यात आफ्रिकन सफारी करण्याचे नियोजन असल्याचे पाटील यांनी सांगितले.

‘‘पुनर्वसन केंद्रात किंवा इतर ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बिबट्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडल्यास ते मानवी वस्तीत येऊन हल्ला करण्याची शक्यता असते. अशा बिबट्यांना छोट्या पिंजऱ्यात ठेवण्याऐवजी मोठ्या पिंजऱ्यात ठेवून सफारीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर याच बिबट्यांच्या देखभाल व संवर्धनासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे बिबट्या सफारीसाठी केलेली तरतूद ही स्वागतार्ह आहे. मात्र याची अंमलबजावणी करताना विचारपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे. ज्यामुळे पर्यटनाबरोबरच बिबट्यांच्या संवर्धनासाठी ही मदत होईल.’’

- अनुज खरे, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.