पुणे: शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातून कोणत्या इच्छुकाला पक्षांतर्गत जास्त पसंती आहे हे जाणून घेण्यासाठी भाजपने आज बैठका घेतल्या. पण मतदारसंघातील आमदारांनी स्वतःची यंत्रणा कामाला लावली. त्यात इच्छुकांना व त्यांच्या समर्थकांना निरोप न देणे, पसंतीक्रम देताना प्रबळ इच्छुकांचे नाव न घेणे, जो इच्छुक नाही अशा कार्यकर्त्यांना पसंतीक्रम देणे असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये कार्यकर्त्यांची नाकेबंदी अन् इच्छुकांची कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
महायुतीमध्ये जागा वाटपाची बोलणी सुरु असताना इच्छुकांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. पुण्यात भाजपचे सध्या पर्वती, खडकवासला, कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत. तर कसब्यातही भाजपकडून निवडणूक लढवली जाणार आहे.
या सहा विधानसभा मतदारसंघात योग्य उमेदवार कोणता असेल याची चाचपणी करण्यासाठी प्रदेश भाजपने कौल घेण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी सोमवारी (ता. ३०) शहर भाजपतर्फे बैठक घेण्यात देऊन मंगळवारी (ता. १) सहा विधानसभा मतदारसंघात पसंतीक्रम देण्यासाठी बैठक होईल असे सांगितले. त्यामध्ये संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी स्वतःला सोडून अन्य तीन इच्छुकांची नावे पसंतीक्रमाने द्यावीत असे सांगण्यात आले. या बैठकीला काही इच्छुकांनी दांड्या मारल्याने त्यांना आज कोणती बैठक होणार याची व्यवस्थित माहिती न मिळाल्याने त्यांचा गोंधळ उडाला. पण ज्या इच्छुकांना आजच्या बैठकीत कोण मतदान करणार आहेत याची यादी मिळविण्याचा प्रयत्न केला असता ही यादी लपवून ठेवण्यात आली. आज सकाळपासून पदाधिकाऱ्यांना फोन करून इच्छुकांनी पसंतीक्रम देण्यासाठी विनंती केली. त्यावेळी त्यातील अनेकांना मला बैठकीचा निरोपच नाही असे सांगितले. तर काही मतदारसंघात मतदान करण्यासाठी येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या अचानक वाढविण्यात आली. त्यामुळे इच्छुकांना आपला ‘गेम’ केला असल्याची जाणीव झाली.
फक्त आमदारांचे नाव घ्यायचे
विधानसभा मतदारसंघातील संघटनेची बांधणीवर आमदारांचा प्रभाव आहे. पण पाचही मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढली आहे. निरीक्षकांना पसंतीक्रम देताना केवळ आमदारांचे नाव द्यायचे अन्य प्रमुख इच्छुकाचे नाव द्यायचे नाही असे खास निरोप देण्यात आले. बैठकीमध्ये कोणता पदाधिकारी कोणाचे नावे सुचवत आहे याचीही यंत्रणा कार्यरत होती.
खडकवासल्यात वाद
खडकवासला विधानसभा मतदारसंघातही निरोप देताना राजकारण झाले. तरीही इच्छुक व त्यांचे कार्यकर्ते तेथे पोचले. आम्ही इच्छुक आहोत त्यासाठी आमचे नाव कार्यकर्त्यांना कळू द्या असे सांगत एका इच्छुकाने आमदारांच्या निकटवर्तीयासोबत वाद घातल्याने वातावरण तापले होते. पण अन्य पदाधिकाऱ्यांनी त्या दोघांनाही शांत केले. पर्वती विधानसभा मतदारसंघात ३०-३५ वर्ष काम करणाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना निरोप दिले नसल्याने ते बैठकीत जाब विचारणार होते. पण अन्य पदाधिकाऱ्यांनी समजूत काढल्याने ते देखील गप्प बसले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.