Pune News : वाचनातून निर्माण होणार नव सर्जनशीलता : डॉ. रघुनाथ माशेलकर

राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात डॉ. माशेलकर यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम झाला. यावेळी सागर देशपांडे यांनी डॉ. माशेलकर यांच्याशी संवाद साधला.
Dr. Raghunath Mashelkar
Dr. Raghunath Mashelkarsakal
Updated on

पुणे - ‘पूर्वीच्या काळी ज्ञानात हळूहळू वाढ होत असे. ज्ञानातील वाढीचा वेग कमी होता. परंतु आजकाल दर पाच-दोन वर्षांनी ज्ञान बदलत आहे आणि वाढत आहे. त्यामुळे आपण पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानार्जन करायला हवे. त्यातूनच नवसर्जनशीलता (इनोव्हेशन) निर्माण होणार आहे. या काळात वाचन केले नाही, तर तुम्ही मागे पडाल,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात डॉ. माशेलकर यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम झाला. यावेळी सागर देशपांडे यांनी डॉ. माशेलकर यांच्याशी संवाद साधला. ‘मी महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले. मराठीत शिकल्याने काही बिघडले नाही,’ असे सांगत डॉ. माशेलकर यांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

तरुणांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले,तरुणांमध्ये प्रचंड सुप्त शक्ती आहेत. अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद तरुणांमध्ये आहे. या सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी तरूणांनी ज्ञानाने समृद्ध व्हायला हवे आणि त्यासाठी जास्तीत जास्त पुस्तके वाचायला हवीत. एखाद्या पुस्तकात एकाच दिशेने विचार मांडलेले असतात. परंतु वाचक म्हणून आपण सगळ्या बाजूंनी वाचन करायला हवे. जितके जास्त वाचू तितके जास्त ज्ञान मिळेल, त्यातून आत्मविश्वास वाढेल.’

‘आपल्या  मेंदूची क्षमता प्रचंड आहे. आपण त्यातील केवळ १० टक्के क्षमतांचा वापर करतो. परंतु मेंदूच्या क्षमता विस्तार आणि वापर करण्यात ज्ञान आणि वाचनाचे महत्त्व आहे,’’ असे मत डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केले.

डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी वाचनाचे महत्त्व सांगताना मांडलेले मुद्दे :

- वाचनातून शब्द संग्रह समृद्ध होईल

- शब्दांचा नेमका वापर कळतो.

- वाचनातून ज्ञान समृद्ध होत असल्याने आपोआप आत्मविश्वास वाढतो.

- वाचनामुळे निर्णय क्षमता वाढते.

‘पुणे शहर हे अनेक महोत्सवांचे शहर आहे. या महोत्सवात आता पुणे पुस्तक महोत्सवाची भर पडली आहे. या पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याची संधी मिळत आहे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ही चांगली बाब आहे.’

- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

पुणे पुस्तक महोत्सवात शनिवारी (ता.२३) होणारे कार्यक्रम :

कार्यक्रम : वेळ

- शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘गोष्ट सांगा’ कार्यक्रम : सकाळी १०.३० वाजता

- ‘गोष्ट रंग’ नाटक  : दुपारी १.३० वाजता

- ‘छत्रपती शिवाजी महाराज चक्रवर्ती सम्राट’ सादरीकरण उदय माहूरकर : दुपारी २.३० वाजता

- पुस्तकांवर चर्चा : दुपारी ३.३० वाजता

- टॅलेंट हंट : सायंकाळी ४.३० वाजता

- ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ कार्यक्रम, सहभाग- डॉ. नरेंद्र जाधव, अजित रानडे, राजेश पांडे, मिलिंद कांबळे, सुनील भंडगे : सायंकाळी ५.०० वाजता

- मालिनी अवस्थी यांचा गाण्यांचा कार्यक्रम : सायंकाळी ६.३० वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.