Pune : पुण्यात बीआरटीबाबत टोकाची मतं आहेत. एक बीआरटी पूर्ण क्षमतेने सुरळीत चालवा आणि दुसरे बीआरटी वाहतुकीला अडथळा ठरते म्हणून काढून टाका. बीआरटीबाबत नकारात्मक मत तयार होण्यास महापालिका आणि पीएमपीएमएल हेच जबाबदार आहेत. यांनी कधीही बीआरटी सक्षमपणे चालवली नाही, त्यामुळे खासगी वाहतूक वाढून शहरात वाहतुकीची पुरती 'वाट' लागली आहे.
संभाजी पाटील @psambhajisakal
एखादी योजना नीटपणे चालविण्यासाठी दोन तीन वर्षांचा कालावधी पुरेसा असतो. पण पुण्यात २००७ पासून आजपर्यंत म्हणजेच १६ वर्षे होऊनही बीआरटी नीटपणे चालवता येत नसेल तर दोष फक्त बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्यांना देता येणार नाही. आपल्याला बीआरटी चालवता आली नाही किंवा आपल्याला या मार्गाचा वापर केवळ निवडणूक जाहीरनाम्यातील एक रकाना भरण्यासाठी करायचा होता, हे मान्य करावे लागेल.
आज जे काही मोडके तोडके बीआरटी मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे पुण्यातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला आहे. या मार्गातून दररोज ९ हजार बसफेऱ्या होतात. त्यातून तब्बल सव्वा पाच लाख प्रवाशांची अपघातमुक्त, सुरक्षित वाहतूक होते. जर सध्याची बीआरटीही अस्तित्वात नसती तर या सर्व बसगाड्या एकत्रित धावल्या असत्या तर वाहतुकीची काय अवस्था झाली असती याचा विचार करावा. बीआरटी मार्ग काढून टाका म्हणणाऱ्यांनी हडपसरचे चित्र डोळ्यासमोर आणायला हवे. मुळात बीआरटी मार्ग नको म्हणणारे कधीही पीएमपीतून प्रवास करीत नाहीत, त्यामुळे पीएमपीला स्वतंत्र मार्ग का हवा याची त्यांना जाणीवच नाही.
नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गात घुसलेल्या तेलाच्या टॅंकरला अपघात झाला. टॅंकर उलटल्याने हा मार्ग बंद ठेवावा लागला, त्यानिमित्ताने बीआरटी मार्गातील इतर वाहनांच्या घुसखोरीचा प्रश्न चर्चेला आला. बीआरटी मार्गात मोठ्या प्रमाणावर इतर वाहने घुसतात, ही वस्तुस्थिती आहे. या घुसखोरीमुळे पीएमपीला अडथळा होतो, हे खरेच आहे. पण घुसखोरी करण्याची मानसिकता का तयार होते याच्याही खोलात जायला हवे.
सर्वात पहिले कारण म्हणजे या मार्गावर पूर्ण क्षमतेने कधीही बस धावल्या नाहीत. बीआरटीतून दर मिनिटाला दोन बस धावल्या पाहिजेत. पण सध्या त्याची वारंवारता फारच कमी आहे. त्यामुळे प्रवासी खासगी वाहनांकडे वळले आहेत. ज्या दर्जाच्या बस बीआरटीवर सोडायला हव्यात, तो दर्जाही पीएमपी कडून राखला जात नाही. दुसरे म्हणजे या मार्गाची रचना सदोष आहे. एकट्या कात्रज - स्वारगेट मार्गावर आतापर्यंत दीड हजार कोटी रुपये खर्च झाले असतील, पण त्यानंतरही हा मार्ग नीट होऊ शकला नाही.
त्यावर पुरेशा बस सोडण्यात आल्या नाहीत. बीआरटी म्हटले की, आपण रस्त्याच्या मधोमध सुरू केलेला रस्ता एवढेच डोळ्यासमोर आणतो, पण बीआरटी मार्गातून जाणाऱ्या बस गाड्यांचा कधीही गांभीर्याने विचार झाला नाही. पुरेशा बस उपलब्ध करण्याचा प्रयत्न झाला नाही. आजही पीएमपीकडे बस संख्या अपुरी आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या जास्त असतानाही बस पुरवता येत नाहीत, अशी स्थिती आहे. बीआरटी मार्गात असणारे बसस्टॉप सुसज्ज असावेत. तेथे 'रिअल टाइम इन्फॉर्मेशन सिस्टीम' असावी.
प्रत्येक बस मध्ये तिची कनेक्टिव्हिटी असेल. पण प्रत्यक्षात यातील काहीच आले नाही. वेळोवेळी टेंडर निघाली, घोषणा झाल्या पण आयटी सिटी असणाऱ्या पुण्यात ही सिस्टीम कार्यान्वित झाली नाही, हे दुर्दैव आहे. या सर्व कारणांमुळे बीआरटी नीट चालली नाही आणि रस्ता अडविणारा मार्ग अशी तिची प्रतिमा झाली.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची आणखी 'वाट' लावायची नसेल तर बीआरटी सक्षमपणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चालवायला हवी. खासगी वाहने कमी वापरण्यासाठी पुण्यात सध्या तरी पीएमपीला पर्याय नाही. त्यामुळे पीएमपीतील घुसखोरी कोणी रोखायची याविषयी टोलवाटोलवी करण्यापेक्षा पीएमपी, महापालिका आणि पोलिस यांनी बीआरटी चांगली पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करावा.
हे नक्की करा
- बीआरटीतील बसगाड्यांची वारंवारता वाढवावी.
- बीआरटी बसस्टॉप सुसज्ज करावेत
- बीआरटी मार्ग सक्षमपणे चालविण्यासाठी तयारी
- घुसखोरी रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.