कल्याणीनगर अपघात प्रकरणात आत्तापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या गुन्ह्यात अल्पवयीन आरोपीविरुध्द भादंवि ३०४ चा गुन्हा दाखल असून, तो सध्या बाल सुधारगृहात आहे.
पुणे : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील (Pune Car Accident Case) अल्पवयीन आरोपीचे ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) घेतलेले रक्ताचे नमुने हे दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याची धक्कादायक बाब डीएनए चाचणीतून (DNA Test) समोर आली आहे. ससूनमधील अधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत ‘क्लीन चीट दिली होती.
ससूनमध्ये आरोपीच्या रक्त चाचणीच्या येणाऱ्या फॉरेन्सिक अहवालाबाबत (Forensic Report) संशय होता. त्यामुळे पोलिसांनी औंध सरकारी रुग्णालयात अल्पवयीन आरोपीची डीएनए चाचणी केली होती, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (ता. २७) दिली.
या प्रकरणात ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना अटक केली आहे. तिसऱ्या आरोपीला अटक करण्याची कारवाई सुरू आहे. आरोपींच्या विरोधात भक्कम पुरावे एकत्रित करण्यात येत आहेत, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीच्या पहिल्यांदा घेतलेल्या रक्त चाचणीचा फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाला आहे. परंतु ते रक्ताचे नमुने अल्पवयीन आरोपीचे नाहीत. त्यामुळे त्यात अल्कोहोल आढळून आले की नाही, हे महत्त्वाचे नाही. त्यात अल्कोहोल आढळून आलेले नाही. औंध रुग्णालयात अल्पवयीन आरोपीची डीएनए चाचणी घेण्यात आली. दुसऱ्यांदा रक्ताचे नमुने २० तासानंतर घेण्यात आले होते. त्यामुळे त्यात अल्कोहोल आढळून आलेले नाही. मात्र, हे प्रकरण भादंवि ३०४ (अ) अंतर्गत केवळ निष्काळजीपणे वाहन चालविल्याचे नाही.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अल्पवयीन आरोपीवर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे कलम ३०४ लावण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या तपासात अल्कोहोलचा अहवाल आमच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. पोलिस तपासात त्याची काही अडचण येणार नाही. या प्रकरणात प्राथमिक दोषी आढळलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ससूनमध्ये वैद्यकीय तपासणीच्या वेळी पोलिस उपस्थित असताना रक्ताचे नमुने कसे बदलले? याबाबत पोलिस आयुक्त म्हणाले, ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि डीव्हीआर ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याच्या तपासात सर्व कंगोरे तपासण्यात येत आहेत. यापुढेही जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
डॉ. अजय तावरे यांचे फोन कॉल डिटेल्स तपासण्यात येत आहेत. डॉ. तावरे यांना आमदार सुनील टिंगरे यांचा फोन आल्याची चर्चा आहे, या प्रश्नावर अमितेश कुमार म्हणाले, रविवारी रात्री फॉरेन्सिकचा अहवाल प्राप्त झाला आहे. तपास अद्याप प्राथमिक स्तरावर आहे. पोलिस सर्व शक्यतांचा तपास करीत आहेत. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने घेतले. परंतु डॉ. तावरे यांच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्याच्या पेटीत फेकून दिले. त्यानंतर दुसऱ्याच व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेऊन त्याच्यावर डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीचे नाव लिहिल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आत्तापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या गुन्ह्यात अल्पवयीन आरोपीविरुध्द भादंवि ३०४ चा गुन्हा दाखल असून, तो सध्या बाल सुधारगृहात आहे. अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास दिल्याबाबत अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि मद्य दिल्याप्रकरणी संबंधित पबचालकांवर बाल न्याय कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
तसेच, चालकाचे अपहरण करून त्याच्यावर मोटार चालविल्याचा दबाव आणल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि ३०४ च्या दाखल गुन्ह्यात गुन्ह्याचा कट रचण्यासाठी १२० बी, बनावट पुरावा तयार केल्याबाबत ४६७ आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबाबत २०१, २१३, २१४ ही कलमे वाढविण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.