किरकटवाडी : पालिकेत समावेश होण्याच्या काही महिने अगोदर लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेले नांदेड,किरकटवाडी व खडकवासला या गावांतील सत्तर ते ऐंशी टक्के सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद आहेत. या गावांचा पालिकेत समावेश झाल्यानंतर बंद असलेल्या कॅमेऱ्यांची एकदाही दुरुस्ती न झाल्याने 'असून अडचण आणि नसून खोळंबा' अशी अवस्था झाली आहे.
किरकटवाडी गावच्या हद्दीत एकूण 64 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यापैकी सध्या केवळ 17 कॅमेरे सुरू असून तब्बल 47 कॅमेरे बंद आहेत. खडकवासला गावच्या हद्दीत एकूण 33 कॅमेरे बसविण्यात आले होते त्यातील केवळ 5 कॅमेरे सुरू असून 28 कॅमेरे बंद आहेत. दोन्ही गावांतील एकत्रीत विचार केल्यास सत्तर ते ऐंशी टक्के कॅमेरे सध्या बंद असून दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
जे.पी.नगर मध्ये केवळ उद्घाटन झाले...... नांदेड गावच्या हद्दीतील सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या जयप्रकाश नारायण नगर वसाहतीत लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी केवळ उद्घाटनाचा कार्यक्रम झाला मात्र एकही दिवस कॅमेरे सुरू करण्यात आलेले नाहीत.सुरु न होताच कॅमेरे व खांबांना गंज चढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे फक्त दिखाव्यासाठी कॅमेरे बसविण्यात आले आहेत का? असा प्रश्न येथील तरुण उपस्थित करत आहेत.
कॅमेरा आहे पण बंद आहे!.......एखादी चोरीची घटना, वाहनांच्या तोडफोडीची घटना, हाणामारी किंवा एखाद्यावर हल्याची घटना, अपघाताची घटना घडल्यानंतर पोलीस किंवा स्थानिक नागरिक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यासाठी गेल्यानंतर कळते की, कॅमेरा बंद आहे! त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसविण्यात आलेले कॅमेरे निरुपयोगी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
" वीस ते पंचवीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत परंतु एकही दिवस सुरू झाले नाहीत.लाखो रुपये खर्च झाले मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.नागरिकांवर उद्घाटनाचे फोटो पाहून समाधान मानण्याची वेळ आली आहे." नितीन थोरे, नागरिक, जेपी नगर, नांदेड.
"जोपर्यंत ग्रामपंचायतीकडे अधिकार होते तोपर्यंत वेळेत देखभाल-दुरुस्ती करण्यात येत होती. कॅमेरे व डीव्हीआर यांमधील अंतर जास्त असल्याने सतत कॅमेऱ्यांमध्ये तांत्रिक बिघाड होत असतो. पालिकेने काहीतरी व्यवस्था करुन कॅमेऱ्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे." सौरभ मते, माजी सरपंच, खडकवासला.
" बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सविस्तर माहिती घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल." संजीव ओहोळ, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे मनपा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.