National Science Day : पुणे झाले ‘विज्ञानमय’ ; विविध संस्थांमध्ये व्याख्याने, प्रदर्शने

राज्यभरातून दाखल झालेले विद्यार्थी, संशोधन संस्थांसह शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठातील विविध विभागांत भरलेली प्रदर्शने, मूलभूत प्रयोगांपासून महाकाय प्रकल्पांचे सादरीकरण, शास्त्रज्ञांच्या व्याख्यानांमुळे पुणे शहर बुधवारी जणू विज्ञानमय झाले होते.
National Science Day
National Science Day sakal
Updated on

पुणे : राज्यभरातून दाखल झालेले विद्यार्थी, संशोधन संस्थांसह शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठातील विविध विभागांत भरलेली प्रदर्शने, मूलभूत प्रयोगांपासून महाकाय प्रकल्पांचे सादरीकरण, शास्त्रज्ञांच्या व्याख्यानांमुळे पुणे शहर बुधवारी जणू विज्ञानमय झाले होते. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शहरातील सर्वच संशोधन संस्थांनी सर्वसामान्यांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यामुळे सकाळपासूनच शालेय विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाच्या ठिकाणी रांगा लावल्या होत्या. आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रात (आयुका) आदित्य एल-१, चांद्रयान, स्क्वेअर किलोमीटर अरे, लायगो आदी मोठ्या प्रकल्पांचे प्रारूपही मांडण्यात आले होते.

विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांशी संवादही साधला. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) प्रा. रुची आनंद यांचे विशेष व्याख्यान पार पडले. या वेळी विशेष कामगिरी करणारे विद्यार्थी, वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान विद्याशाखेतील सर्वच विभागांत विशेष प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने इस्रोच्या मोहिमांची माहिती देण्यात आली. दिवसभर वेगवेगळ्या प्रकराची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. सकाळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी भारतरत्न डॉ. सी. व्ही. रमण यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली.

प्रा. जयंत नारळीकर यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

पुणे : आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रातील (आयुका) ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यासोबतच्या ‘आस्क द सायंटिस्ट’ या कार्यक्रमाशिवाय पुण्यातील विज्ञान दिन अपूर्ण आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मागील काही महिन्यांपासून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम टाळले होते. मात्र, विज्ञान दिनी आयुकात येत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा नित्यनियम त्यांनी कायम ठेवला आहे. आयुकातील या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाला संचालक प्रा. आर श्रीआनंद, डॉ. सुहृद मोरे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. नारळीकरांसह उपस्थित शास्त्रज्ञांनी उत्तरे दिली. डॉ. श्रीआनंद म्हणाले, ‘‘आयुकातील विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात सात हजारांहून अधिक विज्ञान प्रेमी सहभागी झाले. पुण्यासह घोडेगाव, हिंगोली आणि परभणी सारख्या दूरच्या ठिकाणाहून विद्यार्थी आले होते. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच उपस्थिती दर्शवली.’’

National Science Day
Mall Sealed By PMC : मॉलच्या करआकारणीवर हरकत; २५ लाख रुपयांचा धनादेश जमा

आघारकर संस्थेतर्फे शेतकरी मेळावा

आघारकर संशोधन संस्थेच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बारामती येथील शेतात शेतकरी मेळावा आणि प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. तेथे गहू, सोयाबीन आणि द्राक्षाच्या वाणांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच शाश्वत शेतीसाठीचे तंत्रज्ञानही मांडण्यात आले. पुण्यातील संस्थेत वैज्ञानिकांशी संवाद या कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.

‘आयसर’मध्ये मराठीतून व्याख्याने

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) प्रदर्शनाबरोबरच विज्ञानातील नव्या विषयांसंदर्भात इंग्रजी आणि मराठीत व्याख्यानांचे आयोजन केले होते. संचालक प्रा. सुनील भागवत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे शोध हिवतापाच्या लशीचा, अणूचे अंतरंग, विश्वाचे छोटे तुकडे, चमत्कारामागील विज्ञान यावर व्याख्याने मराठीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.