वयाच्या सहाव्या वर्षी सर्वसाधारण मुले अंकओळख आणि अक्षरओळख करून घेत असतात. पुस्तके या संकल्पनेशी त्यांचा नुकताच परिचय होत असतो.
- महिमा ठोंबरे
पुणे - वयाच्या सहाव्या वर्षी सर्वसाधारण मुले अंकओळख आणि अक्षरओळख करून घेत असतात. पुस्तके (Book) या संकल्पनेशी त्यांचा नुकताच परिचय होत असतो. मात्र या वयात पुण्यातील एका चिमुकलीने केवळ पुस्तक वाचलेच नाही, तर स्वतः दोन पुस्तके देखील लिहिली. (Writing) या चिमुकलीचे नाव आहे अनायशा केरिंग. (Anayasha Kering) नुकतेच या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन झाले असून दोन पुस्तकांचे प्रकाशन होणारी जगातील सर्वात तरुण लेखिका म्हणून ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ने (World Book of Record) तिच्या या कामगिरीची दखल घेतली आहे.
अनायशाच्या लेखनाच्या या प्रवासाबाबत अनायशाची आई, शलाका केरिंग म्हणाल्या, ‘लहानपणी मी अनायशाला पुस्तके वाचून दाखवत असताना ती लक्षपूर्वक ऐकत असे. साडेचार वर्षांची असताना तिने ‘मी पण पुस्तक लिहू शकते का?’, असा प्रश्न मला विचारला. मी सुरूवातीला ती सहज म्हणत असेल, असे वाटून होकार दिला. त्यानंतर अनायशाने दैनंदिनीत दिवसभरात ज्या गोष्टींबाबत कृतज्ञता वाटली, ज्या गोष्टींनी तिला आनंद दिला, त्या गोष्टींची नोंद ठेवायला सुरूवात केली. ती याकडे गांभीर्याने पाहतेय, हे लक्षात आल्यावर आम्ही त्याचे पुस्तकात रुपांतर केले. त्यानंतर वर्षभरातच तिने दुसरे पुस्तकही लिहिले.’ अनायशाला पुढेही पुस्तके लिहिण्याची इच्छा असून पुढील वर्षीच्या वाढदिवसापर्यंत एक नवीन पुस्तक लिहून पूर्ण करण्याचा तिने निश्चय केला आहे.
‘बकेटफुल ऑफ बेटिट्युड्स’ आणि ‘व्होकॅबलरी थ्रू इमेजरी’ ही या दोन पुस्तकांचे नावे आहेत. ही पुस्तके सध्या दिल्ली व मुंबईच्या ऑक्सफर्ड आणि क्रॉसवर्ड बुकस्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. तसेच, ॲमॅझॉन, फ्लिपकार्ट, किंडल आदी संकेतस्थळांवरही ती उपलब्ध आहेत. तर पुण्यातील क्रॉसवर्ड बुकस्टोअरमध्ये ही पुस्तके १५ एप्रिलपासून उपलब्ध होणार आहेत. या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन अनायशा सहा वर्षांची असताना झाले. ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये यासाठी तिची सर्वात तरुण लेखिका म्हणून नोंद केली आहे. तर, ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’ने ‘यंगेस्ट वर्डस्मिथ’ म्हणून तिची दखल घेतली आहे.
पुस्तकांच्या हटके संकल्पना
अनायशाचे पहिले पुस्तक ‘बकेटफुल ऑफ बेटिट्युड्स’ हे आपल्या दैनंदिन आयुष्यातील गोष्टींविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे आहे. तिला आनंद देणाऱ्या १०१ लहान-मोठ्या गोष्टींची यादी या पुस्तकात आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक अनायशाच्याच हस्तलिखितात प्रकाशित केले असून त्यात तिने काढलेली चित्रे व रंगांचा केलेला वापरही तसाच ठेवला आहे. तर, ‘व्होकॅबलरी थ्रू इमेजरी’ या पुस्तकात अनायशाने शब्दांचे अर्थ लक्षात ठेवण्याच्या एका नवीन पद्धतीचा वापर केला आहे. शब्दांचा अर्थ डिक्शनरीत पाहून ते घोकण्यापेक्षा त्या शब्दाचा अर्थ आणि उच्चार यांच्याशी संबंधित चित्रातून आणि विविध उदाहरणांतून समजावून सांगण्याचा प्रयत्न तिने केला आहे. अशा ५१ शब्दांचा या पुस्तकात समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.