Pune Bird : कवडीपाट येथे पाहुण्यांसह स्थानिक पक्ष्यांचा किलबिलाट

अभ्यासकांसह पक्षीप्रेमींसाठी सुरू झाला उत्सव
Pune Bird
Pune BirdSakal
Updated on

हडपसर : उत्तरेकडे सुरू झालेल्या गारठ्यामुळे विविध प्रकारचे देशी-विदेशी पक्षी उबदार वातावरण आणि अन्नाच्या शोधासाठी दक्षिणेकडे झेपावले आहेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करीत ते शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पाणवठ्यावर विसावले आहेत. दरवर्षीप्रमाणे पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणीकाळभोर जवळील कवडीपाट येथील मुळा-मुठा नदी पात्राचा परिसर या पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला आहे. सुर्योदयाला होणाऱ्या शेकडो प्रकारच्या या पक्ष्यांच्या मनमोहक हालचाली टीपण्यासाठी पक्षीप्रेमींची येथे गर्दी होऊ लागली आहे.

कवडीपाट येथील मुळा-मुठा नदीच्या विस्तीर्ण जलाशयावर सध्या चक्रवाक, भिवई, थापट्या या बदकांखेरीज दलदल ससाणा, तुतवार, पिवळा धोबी, पांढरा धोबी, राखी धोबी, पाणलावा, रफ, रक्तसुरमा, गॉडविट, नामा, शेकाट्या, नदीसूरय, यांसारख्या स्थलांतरित पक्ष्यांबरोबरच राखी बदक, चित्रबलाक, राखी बगळा, मोरबगळा, मध्यम बगळा, छोटा बगळा, वंचक, जांभळा बगळा, पांढरा शराटी, काळा शराटी, ताम्र शराटी, चमचा, रातबगळा, कंठेरी चिखल्या इत्यादी स्थानिक स्थलांतरित पक्षी शेकडोंच्या संख्येने विहार करताना दिसत आहेत. पक्ष्यांच्या या संमेलनात क्षणाक्षणाला निर्माण होणारी विहंगम दृश्य टीपण्यासाठी हौशी पक्षी निरिक्षक व अभ्यासकांसह पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे.

उत्तर गोलार्धात या काळात बर्फवृष्ठी होत असल्याने तेथील नद्या, तळी, सरोवरे गोठून जातात. जमीनीवर बर्फ साठून ती झाकली जाते. त्यामुळे तेथे अन्नाचे मोठे दुर्भिक्ष निर्माण होत असते. याशिवाय रात्र मोठी व दिवस लहान असल्याने अन्न मिळवण्यासाठी पक्ष्यांना पुरेसा वेळही मिळत नाही. त्यामुळे या प्रदेशातील पक्ष्यांना दक्षिणेकडे स्थलांतर करावे लागते. त्यामध्ये करकोचे, बदके, शिकारी पक्षी, कीटक भक्षी वटवटे, यांसारखे पक्षी मोठ्या संख्येने आहेत.

विशाल तोरडे

संचालक, 'निसर्गायात्री' पर्यावरण प्रेमी संस्था व पक्षी अभ्यासक

पक्ष्यांच्या अचूक प्रवासाचे तंत्र :

हजारो किलोमीटरच्या स्थलांतराच्या या प्रवासात पक्षी ग्रह नक्षत्रांचा मागोवा घेत मार्गक्रमण करतात. त्यांचा हा प्रवास दिवसा सूर्य व रात्री नक्षत्रांच्या मदतीने होत असतो. याशिवाय पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र, वायूलहरी, उंच पर्वत, मोठे जलाशय, सरोवरे यांचाही पक्ष्यांना मार्गदर्शक खूणा म्हणून उपयोग होतो.

कवडीपाटसह जिल्ह्यातील विविध पाणवठ्यावर आढळते हे पक्षी वैभव :

चमकदार शराटी, काळा शराटी, पांढरा शराटी, ब्राह्मणी बदक, चमचा, प्लवर, तुतवार, ठिपकेवाला तुतारी, शेकाट्या, राखी बगळा, जांभळा करकोचा, थापट्या, तारवाली भिंगरी, पाणकावळा, खंड्या, नदी सुरय आदी (ग्लॉसी आयबिस), काळा शराटी (इंडियन ब्लॅक आयबिस), पांढरा शराटी (ब्लॅक हेडेड आयबिस), ब्राह्मणी बदक (रूडी शेल्डक), चमचा (युरेशिअन स्पूनबिल), प्लवर (इंडियन स्पॉट बिल्ड डक), तुतवार (कॉमन सँडपायपर),

ठिपकेवाला तुतारी (वुड सँडपायपर),शेकाट्या (ब्लॅक विंग्ड स्टिल्ट), राखी बगळा (ग्रे हेरॉन), जांभळा करकोचा (पर्पल हेरॉन), थापट्या

(नॉर्दर्न शॉव्हेलर), तारवाली भिंगरी (वायर टेल्ड स्वॅलो), घर पाकोळी (हाऊस स्वॅलो), भारतीय पाणकावळा (इंडियन शॅग), छोटा पाणकावळा (लिटल कॉरमोरंट), खंड्या (व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर), बंड्या किंवा कवड्या धीवर (लेसर पाईड किंगफिशर), नदी सुरय (रिव्हर टर्न), पाणचिरा (इंडियन स्किमर), गाय बगळा (लिटल इग्रेट), ठिपकेदार मनोली (स्कॅली ब्रेस्टेड मुनिया), राखी कोतवाल (ॲशी ड्राँगो), पांढऱ्या पोटाचा कोतवाल (व्हाईट बेलीड ड्राँगो), शिंजीर (पर्पल सनबर्ड), हुदहुद (कॉमन हुप्पो), पांढरा धोबी (व्हाईट वॅगटेल), कोतवाल (ब्लॅक ड्राँगो), वेडा राघू (लिटल ग्रीन बी ईटर), नकल्या खाटीक (लाँग टेल्ड श्राईक), छोटा खाटीक (बे बॅक्ड श्राईक), तपकिरी लिटकुरी (लिटल ब्राऊन फ्लायकॅचर), घार (आणि ब्लॅक काईट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.