Pune :'गुदमरलेल्या टेकड्या' विकासाच्या नावाखाली विनाश नको!

उन्हाळ्यात वृक्षप्रेमी नागरिकांनी पाणी घालून ती रोपे जगविली.
‘गुदमरलेल्या टेकड्या
‘गुदमरलेल्या टेकड्याsakal
Updated on

पुणे : शहरात गेल्या दोन दशकांमध्ये वेगाने बदल झाला आहे. त्याला आता विकास म्हटले जाते. या विकासाच्या नावाखाली टेकड्यांचा विनाश होत आहे. हे आता रोखले पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन टेकड्यांच्या संवर्धनात सक्रिय सहभाग घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्या.

‘सकाळ’ने ‘गुदमरलेल्या टेकड्या’ ही वृत्तमालिका सुरू केली. त्याला शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातून हा सूर निघाला आहे.

मोहन धारिया प्रणीत ‘वनराई’ च्या सहकार्याने पुण्याभोवतालाच्या टेकड्यांची हरितकरणाची मोहीम सुरू झाली. त्याला शाळा-महाविद्यालयांच्या हजारो विद्यार्थ्यांनी आणि निसर्गप्रेमी पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून अक्षरशः लाखो झाडांची रोपे लावण्यात आली.

उन्हाळ्यात वृक्षप्रेमी नागरिकांनी पाणी घालून ती रोपे जगविली. पावसाळ्यात या रोपांनी जोम धरला. परिणामी ३०-३२ वर्षांनंतर या उजाड बोडक्या टेकड्या आता हिरव्यागार दिसू लागल्या आहेत. या टेकड्या वाचविण्याचे मोठेच काम त्या काळात झाले. ही झाडे आता चांगली १०-१५ फूट उंच झाली आहेत. मोर, ससा, भेकर असे वन्य प्राणी आणि असंख्य पक्षी या वनात संचार करू लागले आहेत. अनेक आबालवृद्ध नागरिक व्यायामाला आणि फिरायला नियमितपणे टेकड्यांवर जातात.

या हरित टेकड्या ही प्राणवायू देणारी पुणे शहराची फुफ्फुसेच आहेत. मात्र अनधिकृत झोपड्या, बांधकामे यांचा वेढा या टेकड्यांना पडत आहे. तसेच काही समाजकंटक येथे उन्हाळ्यात वणवे पेटवतात. पुढच्या पिढीकडे वारसा देताना हे गैरप्रकार तत्काळ थांबविले पाहिजेत. या टेकड्या वाचवून त्यांचे संवर्धन केले पाहिजे, असे डॉ. विकास इनामदार म्हणतात.

टेकड्या व त्यावरील वृक्षसंपदा व प्राणीसंपदा म्हणजे शहराचे सौंदर्य. प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या फुफुसांना याच टेकड्या ऑक्सिजन पुरवतात. परंतु विनाशकारी विकासामुळे या टेकड्यांची लचकेतोड चालू आहे. शिल्लक आहेत त्या झोपडपट्ट्यांनी व अतिक्रमणांनी व्यापल्या आहेत. शहरी भागात तेहतीस टक्के भूभागावर वृक्ष आच्छादन हवे असा कायदा असतानाही टेकड्यांची हानी थांबत नाही. प्रशासन, नागरिक व लोकप्रतिनिधी यांना जेव्हा हे समजेल तो सुदिन. अन्यथा प्रदूषण, अतिक्रमण व बोडक्या टेकड्यासाठी पुढील पिढी कधीच माफ करणार नाही.

- शिवाजी पठारे, कोथरूड

‘सकाळ’ने उचललेले पाऊल गौरवास्पद

आज पुणे हे काँक्रिटचे जंगल होत आहे. वृक्षतोड, टेकड्यांवर - नाल्यांवर अतिक्रमण, उपयुक्तता शून्य सायकल ट्रॅक्स, अशास्त्रीय स्पीड ब्रेकर, जागोजागी अडथळे असलेले फुटपाथ, गलिच्छ नद्या, ध्वनिप्रदूषण, वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन, केवळ शोभेसाठी असलेले क्रॉसिंग ब्रिजेस, नेत्यांच्या आश्रयाने उभारलेल्या टपऱ्या आणि फ्लेक्स बोर्ड, संकल्पना : ...नगरसेवक असा उल्लेख असलेले विविध फलक यांसारख्या, अनेक गोष्टी पुणे शहराची वैशिष्ट्ये बनून विद्रूपीकरणास कारणीभूत ठरत आहे.

सामाजिक जागृती व सहभागाची प्रेरणा देणारे ‘सकाळ’ने उचललेले पाऊल अत्यंत गौरवास्पद आहे. पुणे शहर सुधारणा हे कार्य केवळ पुणे मनपा किंवा फक्त नगरसेवकांचे नसून, प्रत्येक पुणेकराने जबाबदारी उचलण्याची गरज व कर्तव्य आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये विविध क्षेत्रांत प्रगल्भ अनुभव आणि ज्ञान असलेली अनेक मंडळी आहेत. त्या सर्वांच्या सहभागाने दूरगामी विचार करून अनेक सुधारणा करता येणे शक्य आहे, असे डॉ. अनिल तोष्णीवाल यांचे म्हणणे आहे.

मानवी जीवनाला धोक्याची घंटा

पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या जवळपास सर्वच टेकड्यांवर मी गेलेलो आहे. त्याकाळी कात्रज, तळजाई, वेताळबाबा टेकडी या टेकडीवर घनदाट जंगल होते. कोकीळ, मोर, पोपट, सुतार पक्षी, ससाणा वगैरे पक्षी हिरडा, आवळा, ऐन, उंबर‌‌‌ बिबवा वगैरे वनस्पती भरपूर प्रमाणात होती, तर रानडुक्कर, सांबार रानगवे यासुद्धा प्राण्यांचे दर्शन होत असे.

टेकड्यांवर भरपूर प्रमाणात वनराई असल्याने पर्जन्यमानसुद्धा भरपूर होत असे. त्यामुळे जमिनीची धूप होत नव्हती. भरपूर ऑक्सिजन व मोकळी हवा मिळत असे. वारजे माळवाडी येथे डुक्कर खिंड नावाची टेकडी आहे त्या टेकडीवाटे रानडुकरे त्या परिसरात शेतात पिकणाऱ्या पिकांचे नुकसान करत असत. सध्या ती टेकडी फक्त नावापुरती उरलेली आहे. तिच्या चोहीकडे सिमेंटची जंगलं उभी राहिली आहेत.

राजकारणी यांच्याच आशीर्वादाने टेकड्यांच्या चोहीकडे अनेक झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या असून उभ्या राहात आहेत. वर नमूद केलेल्या वनस्पतींपैकी आज एखाद दुसरी वनस्पती राहिलेली आहे. बेसुमार वृक्षतोड झालेली आहे. प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. टेकड्यांचे लचके तोडले जात आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे. जैववैविध्यता नष्ट होत चालली आहे. ही मानवी जीवनाला धोक्याची घंटा नाही का, असे संभाजी साळुंखे यांचे म्हणणे आहे.

लोकसंख्या वाढीचा फुगत चाललेल्या भस्मासुर हे टेकड्या गुदमरण्याचे मुख्य कारण आहे. टेकड्या वाचविण्यासाठी आता वाढती लोकसंख्या नियंत्रित केली पाहिजे.

- उमेश भोसले

हरित पुणे हा टेकड्या सुरक्षित ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे शहरातील राजकीय नेतृत्वाने आणि नियोजनकर्त्यांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.

- दीपक साठे

विकासाच्या नावाखाली टेकड्यांची होणारी लूट रोखणे आवश्यक आहे. यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी जरूर आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे सोडून पर्यायी रस्ता शोधणे चुकीचेच. टेकड्या सुरक्षीत राखण्यासाठी रखवालदार असणे जरुरीचे. लागेबांधेला थारा न देता हा निसर्गाचा अमोल वारसा जतन करण्यासाठी जनजागृती महत्त्वाची.

- राजेंद्र चुत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.