Pune Water Demand : पुणे शहराची तहान भागविण्यासाठी किती लागते पाणी? जाणून घ्या!

पुणे शहराची लोकसंख्या वाढत असल्याने तहान देखील वाढली आहे.
Water Supply
Water SupplySakal
Updated on

पुणे - पुणे शहराची लोकसंख्या वाढत असल्याने तहान देखील वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने आगामी २०२४-२५ या वर्षासाठी २१.४८ टीएमसी पाणी कोटा मंजूर करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान गेल्यावर्षी २०.९० टीएमसी पाण्याची मागणी करूनही केवळ १२.८२ टीएमसी पाणीकोटा मंजूर केला होता. त्यामुळे यंदा पुणेकरांच्या गरजेनुसार पाणी मिळणार की पाटबंधारे विभाग हात आखडता घेणार याकडे लक्ष लागले आहे.

पुणे शहराला खडकवासला धरण प्रकल्प, भामा आसखेड धरण, रावेत बंधारा या ठिकाणावरून पाणी पुरवठा केला जातो. पण शहराचा बहुतांश भाग हा खडकवासला धरण प्रकल्पावर अवलंबून आहे. महापालिकेचा पाटबंधारे विभागासोबत झालेल्या करारानुसार १२.४१ टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाते. पण शहराची वाढती लोकसंख्या, समाविष्ट झालेली ३४ गावे यामुळे पाण्याची मागणी दरवर्षी वाढत आहे. राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महापालिकेला दरवर्षी पाटबंधारे विभागाला पाण्याचे अंदाजपत्रक तयार करून ते सादर करावे लागते.

यामध्ये गेल्यावर्षीच्या लोकसंख्येत सरासरी दोन टक्के वाढ गृहीत धरली जाते. तसेच महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांची दोन टक्के वाढलेली लोकसंख्या, पुणे शहरात नोकरी, शिक्षक, व्यवसायासाठी रोज ये जा करणारे नागरिक यांना गृहीत धरून पुढील वर्षभरात किमान ७९ लाख ३९ हजार ९७४ इतक्या लोकसंख्येला पाणी द्यावे लागणार आहे. तसेच पाणी गळती ३५ टक्के ग्राह्य धरून महापालिकेने २१.८४ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. गेल्यावर्षी २०२३-२४ यावर्षासाठी २०.९० टीएमसी पाण्याची मागणी केली होती.

पण जलसंपदा विभागाने त्यास कात्री लावत केवळ १२.८२ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला होता. त्यानंतर आता २०२४-२५ या वर्षासाठी पाणी पुरवठा विभागाने २१.४८ टीएमसी पाण्याची मागणी करणारे अंदाजपत्रक आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सादर केले आहे.

३४ गावातील लोकसंख्या वाढली

पुणे महापालिकेत २०१७ मध्ये ११ आणि २०२१ मध्ये २३ अशी ३४ गावे समाविष्ट झालेली आहेत. या गावांची लोकसंख्या ११ लाख १४ हजार ७१४ इतकी गृहीत धरून पाण्याची मागणी केली जात होती. पण महापालिकेने केलेल्या सुधारीत अभ्यासामध्ये ३४ गावांची लोकसंख्या १८ लाख ११ हजार ३४० इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामध्ये धायरी, नांदोशी, नांदेड, कोंढवे धावडे, आंबेगाव खुर्द, उरुळी देवाची, फुरसुंगी, मुंढवा-केशवनगर, मांजरी यागावांची लोकसंख्या ८ लाख ३१३ इतकी आहे. येथे बल्क मीटरनुसार प्रति मानसी १२० लिटर प्रति दिन पाणी दिले जाते. तर उर्वरित गावांमध्ये १० लाख ११ हजार २६ इतकी लोकसंख्या आहे. या भागात जलवाहिनीचे प्रमाण कमी असल्याने टँकरची संख्येत ४० टक्क्यांनी वाढ केली आहे, असे अंदाजपत्रकात नमूद केले आहे.

अशी आहे पाण्याची मागणी

  • जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा - ११.१७ टीएमसी

  • टँकरद्वारे पाणी पुरवठा - ०.१९ टीएमसी

  • समाविष्ट गावांसाठी - २.१५ टीएमसी

  • तरल लोकसंख्येसाठी - ०.१७ टीएमसी

  • व्यावसायिक पाणी वापर - ०.३३ टीएमसी

  • ३५ टक्के पाण्याची गळती - ७.७२ टीएमसी

  • एकूण - २१.४८ टीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.