पुणे - पुणे (Pune) व पिंपरी चिंचवड शहर (Pimpri Chinchwad City) आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या चालू असलेले कोरोनाचे निर्बंध (Corona Restrictions) यापुढेही जैसे थे ठेवण्यात आले आहेत. (Pune City Corona Restrictions Continue)
शहरातील दुकाने ही पूर्वीप्रमाणे दुपारी चार वाजेपर्यंतच उघडी ठेवता येणार आहेत. शिवाय फेरीवाल्यांना चार वाजल्यानंतर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे दुकानदार व नागरिकांवर कडक कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिला असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. ९) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शहर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शहरातील सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मागणी केली होती. परंतु कोरोनाचा धोका अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे दुकानांच्या वेळेत बदल करण्याबाबत आणि निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेतला नाही. याउलट चार वाजल्यानंतर फेरीवाले, हातगाडे यांच्यामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी या सर्वांना चारनंतर बंदी घातली आहे.
सद्यःस्थितीत पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा दर ४.९ टक्के, पिंपरी चिंचवडमधील ५ टक्के तर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ७.३ टक्के इतका आहे. जिल्ह्याचा सरासरी कोरोनाबाधित दर हा सहा टक्के आहे. शिवाय संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. या बाबी विचारात घेता, बालकांसाठी उपचाराची सुविधा निर्माण केल्या आहेत. लसीकरणही वाढविले जात आहे. परंतु लसीकरणाच्या तुलनेत केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा होत नसल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला.
पालकमंत्री पवार यांनी आज (ता.९) पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीला खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पालिका आयुक्त विक्रम कुमार, शहर व जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.
विकेंड लॉकडाऊन कायम
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारने आठवड्यातील शेवटचे दोन दिवस (शनिवार व रविवार) विकेंड लॉकडाऊन लागू केलेला आहे. हा विकेंड लॉकडाऊन यापुढेही चालूच राहणार आहे. सुट्टीच्या निमित्ताने पर्यटनस्थळी आणि तीर्थक्षेत्रावर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे विकेंड लॉकडाऊन शिथिल केला जाणार नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील, असे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
... तर फेरीवाल्यांवर कडक कारवाई
फेरीवाले व हातगाडी व्यावसायिकांमुळे दुपारी चार वाजल्यानंतर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे अन्य दुकानांप्रमाणेच फेरीवाले व हातगाडी व्यावसायिकांनाही चार वाजेपर्यंतच त्यांचा व्यवसाय करता येईल. त्यानंतर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. याबाबतचा आदेश पोलिसांना दिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
बुलेट्स
- कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई
- मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे अनिवार्य
- कोरोना लसीचे दोन डोस घेतले असले तरी नियमांचे पालन करणे बंधनकारक
- विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई
- पर्यटनस्थळी कोरोना निर्बंधांची कडक अंमलबजावणी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.