- प्रसाद कानडे
पुणे - मेट्रोची सेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मेट्रोने दररोज सुमारे ६५ हजार नागरिक प्रवास करतात. विस्तारित मार्गांवर मेट्रोची सेवा सुरू झाल्यावर पीएमपीला मोठा फटका बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, पीएमपीच्या प्रवासीसंख्येत घट होण्याऐवजी वाढ झाली आहे.
मेट्रो सुरू होण्यापूर्वी पीएमपीची दैनंदिन प्रवासी संख्या १२ लाख होती. ती आता १३ लाख झाली आहे. अनेक नागरिकांनी आपल्या वाहनांनी प्रवास न करता मेट्रोला प्राधान्य दिले. परिणामी, मेट्रोच्या प्रवासीसंख्येत वाढ झाली आहे. दुसरीकडे नागरिक मेट्रो स्थानकापर्यंतचा अथवा स्थानकावर उतरल्यानंतरचा प्रवास पीएमपीने करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे पीएमपीच्या प्रवासी संख्येतही वाढ होत आहे. एकूणच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा फायदा मेट्रो व पीएमपीला होत आहे.
वाहतुकीवरील ताण कमी होणार
शहरातील वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना मेट्रोमुळे फायदा झाला आहे. प्रवास गतिमान व आरामदायक होत असल्याने प्रवासी मेट्रोला प्राधान्य देत आहेत. नंतर हेच प्रवासी घर, कार्यालय अथवा इतर ठिकाणी जाण्यासाठी पहिले प्राधान्य पीएमपीला देत आहेत. त्यानंतर रिक्षाचा विचार केला जातो. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यास वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
सात स्थानकांवर फीडर सेवा
मेट्रोच्या सेवेचा फायदा पीएमपीलाही होताना दिसत आहे. मेट्रोसाठी पीएमपीने दोन्ही मार्गांवरील सात स्थानकांवर फीडर सेवा उपलब्ध केली आहे. फीडर सेवा व शेड्यूल बसमधून स्थानकाजवळ जाणारे हे पीएमपीचे अतिरिक्त प्रवासी आहेत.
जलद सेवा मिळणार
प्रवाशांना जलद सेवा देण्यासाठी पीएमपीने काही मार्गांवर विनावाहक बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होत आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने पीएमपी लवकरच या सेवेचा विस्तार करणार आहे. आगामी काळात १०० पेक्षा जास्त मार्गांवर प्रवाशांना जलद सेवा मिळणार आहे.
सार्वजनिक वाहतूक वाढल्यास...
वाहतुकीचा ताण कमी होणार
अपघातांची संख्या घटणार
वाहतूक कोंडी कमी होणार
प्रदूषण कमी होणार
प्रवाशांच्या वेळेत बचत
वाहनांची संख्या
(जुलै २०२३ पर्यंत) पुणे प्रादेशिक परिवहन विभाग
३३ लाख ७६ हजार ९५८ - दुचाकी
८ लाख १४ हजार ६२५ - चारचाकी
४२ हजार १८५ - कॅब
९९ हजार ०७४ - रिक्षा
२ लाख ५४ हजार ११८ - इतर वाहने
४५ लाख ८६ लाख ९६० - एकूण वाहने
मेट्रोशी आमची स्पर्धा नाही. उलट मेट्रोमुळे खासगी वाहनांची संख्या कमी होईल. याचा फायदा पीएमपीलाही होत आहे. पीएमपीची प्रवासीसंख्या वाढत आहे. येत्या काही दिवसांत यात आणखी वाढ होईल.
- सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.