पुणे : दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (ता.8) पुकारलेल्या 'भारत बंद' आंदोलनामध्ये पुण्यातही मोठ्या संख्येने विविध राजकीय पक्ष, संघटना सहभागी होणार आहेत. मात्र हे आंदोलन शांततेत व्हावे, त्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिस आंदोलनकर्त्यांशी समन्वय ठेवून आहेत, असे पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले आहे. शहरात 20 ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलिस ठाण्यांच्या पातळीवर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
संसदेत संमत झालेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाना या राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा घालत आंदोलन केले आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी मंगळवारी 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात शेतकरी संघटना, शहरातील विविध पक्ष, विविध प्रकारच्या सामाजिक, स्वयंसेवी संघटना सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मंगळवारी संपूर्ण शहरामध्ये चोख बंदोबस्त ठेवला आहे.
याविषयी डॉ.शिसवे म्हणाले, "आंदोलनकर्ते पक्ष आणि संघटनांशी आमचे बोलणे सुरूच आहे. त्यासाठी सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. शहरात होणाऱ्या या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिस आंदोलनकर्त्यांशी समन्वय ठेवून आहेत. पोलिस उपायुक्तांमार्फत विविध पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.''
शहरामध्ये मंगळवारी आंदोलन होण्याची शक्यता आहे, अशी 20 ठिकाणांची नावे पोलिसांना मिळाली आहे. त्या सर्व ठिकाणी लोकशाही पद्धतीने आंदोलन होईल, अशी अपेक्षा आहे. सर्वसामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही. याची पुरेपूर काळजी घेतली आहे. चोख बंदोबस्त ठेवून सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे डॉ.शिसवे यांनी स्पष्ट केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.