Pune Water : पुण्यावरील पाणीकपात तूर्त टळली

पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
 chandrakant Patil
chandrakant Patilsakal
Updated on
Summary

पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पुणे - पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात पाणीपुरवठा विस्कळित होतो. या समस्येच्या अनुषंगाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुणे महापालिकेने आठ दिवसांत उपाययोजना सादर कराव्यात. तोपर्यंत शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच पुढील महिन्यात धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन त्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्याचेही ठरले. त्यामुळे सध्या तरी पुणे शहरावरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. खासदार वंदना चव्हाण, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, राहुल कुल, भीमराव तापकीर, अशोक पवार, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

सध्या पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीमध्ये ११.६१ टीएमसी (दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे शहराला दर महिन्याला दीड टीएमसी पुरवठा केला जातो. सध्याचा उपलब्ध पाणीसाठा विचारात घेतला तर ३१ ऑगस्टपर्यंत पुणे महापालिकेला सहा टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, तर उर्वरित पाच टीएमसीमधून शेतीसाठी दुसऱ्या उन्हाळी आवर्तनासाठी ४.५३ टीएमसी पाणी देता येऊ शकते. त्यामुळे आत्तापासूनच पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात न करता पुढील महिन्यात धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरले, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेने पाणीबचतीसाठी विविध पर्यायांचा अवलंब करावा, अशा सूचनाही महापालिकेला देण्यात आल्या.

बैठकीत जुना मुठा उजवा कालव्याचे अस्तरीकरण, खडकवासला प्रकल्प ते लोणी काळभोरपर्यंत नवा मुठा उजवा कालव्यासाठी बोगदा, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरण आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

दुसरे आवर्तन १ मेपासून

खडकवासला प्रकल्पातील ४ धरणांत मिळून २५ एप्रिलपर्यंत ११.६१ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यानुसार नियोजन करून नवीन मुठा उजव्या कालव्याचे सिंचनासाठी १ मे ते १५ जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे ठरले. पुणे महापालिकेसाठी १५ जुलैपर्यंत ४.५३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे.

पुणे शहरासाठी १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात केल्यास हेच पाणी ऑगस्टपर्यंत पुरवता येऊ शकते. तथापि, एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात पाणीपुरवठा विस्कस्ळित होतो, अशी लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. त्यावर महापालिकेने अभ्यास करून आठ दिवसांत तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करावे. तोपर्यंत पाणीकपात करण्यात येणार नाही. शेतीसाठीही पुरेसा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहेत.

- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.