पुणे : ‘‘कोणत्याही साथीच्या परिस्थितीचा सामना करताना जागतिक आणि प्रादेशिक सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते. बिमस्टेक राष्ट्रांमधील सुव्यवस्थित प्रक्रिया आणि समन्वय मानवी जीवन वाचविण्यात मोठी मदत करू शकते. त्या अनुषंगाने बिमस्टेक राष्ट्रांमध्ये होणाऱ्या ‘पॅनेक्स २१’ या संयुक्त लष्करी सरावादरम्यान आपत्तीच्या काळात अधिसूचना, तयारी आणि प्रतिसाद यंत्रणा यांचा आढावा घेण्यावर भर दिला जाईल,’’ असे मत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी व्यक्त केले.
‘पॅनेक्स २१’ हा बिमस्टेक राष्ट्रांसाठी मानवतावादी साहाय्य, आपत्ती व्यवस्थापनासाठी होणारा संयुक्त लष्करी सराव पुण्यात २० ते २२ डिसेंबर या कालावधीत होत आहे. पॅनेक्सच्या उद्घाटनाप्रसंगी आयोजित परिसंवादात ऑनलाइन माध्यमातून जनरल नरवणे बोलत होते. या संयुक्त लष्करी सरावात भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड या देशातील प्रतिनिधी आणि विषय तज्ज्ञ सहभाग घेणार आहेत. पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांच्या उपस्थितीत ‘पॅनेक्स २१’चे उद्घाटन झाले. यावेळी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास मित्र देशांना मदत करणे, तसेच संसाधनांचा योग्य वापर करण्याचे आवाहन लेफ्टनंट जनरल नैन यांनी केले.
या वेळी जनरल नरवणे म्हणाले, ‘‘जगभरात कोरोनाच्या प्रसारामुळे प्रत्येकाला प्रतिबंधात्मक नियंत्रण, धोरणे आणि प्रोटोकॉल यांस सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. यातून सर्वांना धडे मिळाले आहेत. अलीकडच्या काळात कोरोनामुळे झालेले नुकसान आणि जीवितहानी हे सर्वांनी पाहिले असून अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही.’’
परिसंवादात विविध विषयांवर चर्चा...
सशस्त्र दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि इतर एजन्सी यांच्यात समन्वय हा पॅनेक्स २१ चा मुख्य उद्देश आहे. तर, सोमवारी झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात तीन सत्रांमध्ये परिसंवादाचे आयोजन केले होते. यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन, निती आयोगाचे डॉ. व्ही. के. पॉल तसेच, इतर तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. पहिल्या सत्रात कोरोनामधून मिळालेल्या संकल्पना, मूलभूत गोष्टी आणि अनुभव यासह संबंधित वैद्यकीय पैलूंवर चर्चा झाली. दुसऱ्या सत्रात महामारीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीला प्रतिसाद देण्याच्या यंत्रणेवर, तर तिसरे सत्र आपत्तींच्या व्यवस्थापनेसाठी सशस्त्र दलांचे एकत्रीकरण करण्यावर आधारित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.