पुणे : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जगभरात पुन्हा वाढू लागल्याचा परिणाम पुण्यात जाणवू लागला आहे. शहरात मास्कच्या मागणीत मोठी वाढ झाली असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. त्यामुळे पुणेकरांमध्ये कोरोनाबाबत जागृती आणि काळजी वाढल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या दोन आठवड्यांपर्यंत दुकानात एकाही मास्कची विक्री होत नव्हती. पण आता एकेका दिवसात तीस ते चाळीस मास्कची विक्री होत आहे. यात तरुणांची संख्या मोठी असल्याचेही निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदविले.
चीनसह काही देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन केल्यानंतर पुण्यातील नागरिकांमध्ये जागरुकता दिसत आहे. त्यामुळे मास्कची विक्री वाढली असल्याची माहिती मास्कच्या घाऊक विक्रेत्यांनी दिली.
कोण करतंय सर्वाधिक खरेदी?
मास्क खरेदीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल ज्येष्ठ नागरिक खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरत असल्याचे दिसते. याबाबत ‘एमआयटी’मधील विद्यार्थिनी आर्वी देशपांडे म्हणाली, ‘‘दिवसभर कॉलेजमध्ये मित्र-मैत्रणींबरोबर फिरताना मास्क वापरते. कोरोना प्रतिबंधक लस घेतली असली तरीही मास्कमुळे सुरक्षित वाटते. घराबाहेर पडताना प्रत्येक दिवशी नवीन मास्क लावते. त्यासाठी एकदमच मास्क खरेदी केले आहेत.’
हे करा...
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा
सॅनिटाझरचा वापर करा किंवा स्वच्छ पाण्याने हात वारंवार धुवा
पात्र नागरिकांनी लशीचा बूस्टर डोस घ्या
सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे तंतोतंत पालन करा
सतत नाकाला, तोंडाला हात लावू नका
ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असल्यास दुखणे अंगावर काढू नका
स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळा
एकच मास्क दिवसेंदिवस वापरू नका
कोरोना सुरू झाल्यापासून मी मास्क वापरत आहे. मास्कचा नियमित वापर करतो. कारण, मास्कमुळे श्वसनसंस्थेत जाणाऱ्या विषाणूंना काही प्रमाणात प्रतिबंध होतो. त्यामुळे संसर्गाची शक्यता कमी होते. कोरोनाचे व्हेरियंट सातत्याने बदलत असल्याने एका मागोमाग एक नवीन व्हेरियंट पुढे येत आहे. या सर्वांपासून सुरक्षित राहण्यासाठी मास्कला सध्यातरी पर्याय नाही.
- डॉ. संजय कदम, वैद्यकीय तज्ज्ञ
केंद्र सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केल्यापासून शहरात मास्कची मागणी वाढली आहे. त्यातही एन९५ मास्कपेक्षा ‘थ्री प्लाय मास्क’ला ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसते. गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये मास्कची विक्री वेगाने कमी झाली होती; मात्र गेल्या एक-दोन दिवसांपासून त्यात सातत्याने वाढत आहे.
- अनुप गुजर, वृषभ सर्जिकलचे घाउक विक्रेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.