पुणे : लग्नाच्या कारणावरून वाद झाल्याने एमपीएससी परीक्षा पास झालेल्या दर्शना पवारच्या खुनासाठी वापरलेले कंपासमधील कटर पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केले आहे. त्यासह आरोपी आणि दर्शना यांनी राजगडला जाण्यासाठी वापरलेली दुचाकी आणि खून करताना आरोपीने घेतलेले कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. पुढील तपासासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत (ता.३) वाढ करण्यात आली आहे.
लग्नासाठी नकार दिल्याने रागाच्या भरात दर्शनावर कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चार वेळा वार केले. त्यानंतर दगडाने मारहाण करत तिचा खून केला, अशी कबुली आरोपी राहुल हांडोरे याने नुकतीच पोलिसांना दिली होती.
त्यानुसार त्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तुंची माहिती घेत त्या जप्त करण्यात येत आहेत. १८ जून रोजी दर्शना पवार हिचा राजगडच्या पायथ्याशी मृतदेह सापडला होता. ती मित्र हांडोरेसोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याला २१ जून रोजी रात्री उशिरा त्याला मुंबईत अटक करण्यात आली होती.
पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने हांडोरे याला गुरुवारी (ता. २९) न्यायालयात हजर करण्यात आले होते. हांडोरे याने गुन्ह्यासाठी आणखी दोन शर्ट वापरले होते. ते अद्याप जप्त करण्यात आलेले नाहीत. तसेच खून करून तो काही दिवस फरार झाला होता.
फरार असताना त्याला कोणी मदत केली आहे का? तो नेमका कोणत्या ठिकाणी राहिला, याची माहिती अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. त्यावर आरोपीच्यावतीने ॲड. गणेश माने यांनी युक्तिवाद केला. गुन्ह्याचा प्राथमिक तपास पूर्ण झालेला आहे.
त्यामुळे पोलिस कोठडीची गरज नसून न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी द्यावी, असा युक्तिवाद ॲड. माने यांनी केला. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, असे नमूद करीत न्यायालयाने हांडोरेच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.