बिबवेवाडीत महावीर इलेक्ट्रॉनिक्सजवळ पुखराज इमारतीत ६२ वर्षांचे गृहस्थ राहतात. ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. २३ ऑक्टोबरला सकाळी घरी परतले. तेव्हा बघितले तर घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले. कपाटाचा दरवाजाही उघडाच.
तिजोरीमधून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड गायब. ऐन दिवाळीच्या सणासुदीत अडीच लाखांचे दागिने चोरीस गेल्याने हताश होण्याची वेळ आली. बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांकडून बंद सदनिकांमध्ये घरफोडी, तर गर्दीत महिलांचे दागिने चोरीच्या घटना घडत आहेत.
घरफोडीबाबत २८ ऑक्टोबर रोजी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी बालाजीनगरमधील एका बंद सदनिकेतून पाऊण लाखांचा ऐवज चोरून नेला. शेख दांपत्य नोकरीनिमित्त बाहेरगावी गेले होते. ते २८ ऑक्टोबरला परतले. तेव्हा घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेतील तिजोरीमधून सोन्याचे पदक, झुमके, मंगळसूत्र आणि रोकड चोरून नेली.