शाळा सुरू झाल्या आणि कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. यात दिलासादायक गोष्ट एकच की, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अजूनही अत्यल्प आहे.
पुणे - शाळा सुरू झाल्या आणि कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. यात दिलासादायक गोष्ट एकच की, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अजूनही अत्यल्प आहे. याला कारण, लसीकरण. मात्र, लहान मुलांचे हेच लसीकरण पुणेकरांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही. आता रुग्णसंख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पूर्ण लसीकरण करू, असा संकल्प करण्याची ही वेळ आहे. कोरोना उद्रेकात पुण्यामध्ये देशातील सर्वाधिक रुग्णांची संख्या होती. त्यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक होते. लहान मुलांची संख्या त्या तुलनेत खूप कमी होती. त्यामुळे सुरवातीला ज्येष्ठ नागरिकांपासून लसीकरण सुरू केले. आता ते टप्प्या-टप्प्याने १२ ते १४ वयोगटापर्यंत आणले आहे. पण, जस-जसे ज्येष्ठ नागरिकांकडून मुलांच्या लसीकरणाकडे येऊन तस-तसे लसीकरणाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसते, असे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीतून दिसते.
लस का आवश्यक?
लहान मुलांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण जगभरात कमी असल्याचे दिसून आले आहे. पण, ते कोरोनाचे वाहक असतात. त्यांच्यामुळे घरातील ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांना मुलांच्या माध्यमातून संसर्ग होण्याचा धोका असतो. मुलांना लस दिल्याने संसर्गाची शक्यता कमी होते. त्यामुळे घरातील सदस्यांना होणाऱ्या संसर्गाचा धोकाही कमी होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञ आसाराम खुडे यांनी स्पष्ट केले.
उद्दिष्टापासून दूरच!
पुणे शहराची लोकसंख्या ४२ लाख आहे. त्यामध्ये १२ ते १४ वर्षे वयोगटातील एक लाख चार हजार ५७२ मुला-मुलींना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी जेमतेम २७ टक्के मुलांनी लशीचा पहिला डोस घेतला. तर, दुसऱ्या डोस घेणाऱ्या मुलांचे प्रमाण १५ टक्के आहे. त्यामुळे या वयोगटातील मुले लसीकरणात नापास झाल्याचे दिसते.
पहिल्या डोसमध्ये प्रथम श्रेणी
शहरात १५ ते १८ या वयोगटात एक लाख ७२ हजार ८२८ लोकसंख्या आहे. त्या तुलनेत पहिला डोस घेणाऱ्या मुला-मुलींची संख्या एक लाख १५ हजार ८२७ (६७ टक्के) आहे. तर, दुसरा डोस मात्र ४४ टक्के (७५,६५५) मुलांनी घेतला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
लसीकरण कमी होण्याची कारणे
मुलांच्या परीक्षेच्या दिवसांमध्ये लसीकरण होते
मुले सुट्यांमध्ये पर्यटनासाठी बाहेर गेली
कोरोना कमी झाल्याने पालक निश्चिंत झाले
शहरातील लसीकरण
१२ ते १४ वर्षे
पहिला डोस - २७,८९५
दुसरा डोस - १५,५९४
१५ ते १८ वर्षे
पहिला डोस - १,१५,८२७
दुसरा डोस - ७५,६५५
तुम्हाला काय वाटते?
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्कसोबत लसीकरणही तितकेच महत्त्वाचे आहे. पण शाळा सुरू होऊनही मुलांमध्ये अद्याप लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. याबाबत आपल्या प्रतिक्रिया व सूचना नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. शहरातील खासगी शाळांनी महापालिकेशी संपर्क साधला तर आम्ही मोबाईल व्हॅन पाठवून विद्यार्थ्यांचे मोफत लसीकरण करण्यासाठी तयार आहोत.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका
पहिला डोस घेतला. मात्र, दुसऱ्या डोसच्या वेळेला कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली. त्यामुळे तो घेण्याचे मागे पडले. आता शाळा सुरू झाली आहे. मुलेही घराबाहेर पडत आहेत. आता लसीकरणासाठी नंबर लावणार आहे.
- सुलभा देशमुख, पालक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.