पुणे - 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत म्हणून आम्ही टीका केली तेव्हा आम्हालाच महाराष्ट्र द्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला. पण तेच शरद पवार यांनी त्यांच्या 'लोक माझा सांगाती' पुस्तकातून लिहिले. जंगलातील वाघ हा स्वतःच्या ताकदीवर होता येते, उसने बळ आणून वाघ होता येत नाही' अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.
भाजपच्या प्रदेश कार्यसमिती बैठकीच्या समारोप प्रसंगी फडणवीस बोलत होते. ‘सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारच्या बाजूने निर्णय दिलेला असला तरीही अद्याप काही जणांचे तोंड बंद झालेले नाही. पोपट मेला आहे हे उद्धव ठाकरे यांना कोणीच सांगत नाहीत, असा टोला लगावत देवेंद्र फडणवीस म्हणाले,' हे आपले सरकार पूर्णपणे नैसर्गिक, संविधानिक सरकार आहे.
कर्नाटकमध्ये पराभव झाल्याने महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न लागू करणार असे विरोधक म्हणत आहेत. अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करून महाविकास आघाडीला निवडून येता येणार नाही. इथे फक्त शिवाजी महाराज, नरेंद्र मोदी आणि भाजपचा पॅटर्न चालणार. जे खुर्चीचा विचार करून काँग्रेस सोबत गेले ती शिल्लक सेना आहे. विचारासाठी सत्ता सोडणारे खरे शिवसैनिक हे आपल्या सोबत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून तयार केल्या जाणाऱ्या खोट्या नरेटीवला तुम्ही बळी पडू नका. आपले बूथ मजबूत करा असे आवाहन फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
बैठक संपताच ‘त्याग' शब्दावर चर्चा
२०२३ चे शेवटचे सहा आणि २०२४चे पहिले सहा महिने असून, कोणत्याही कार्यकर्त्याने मनात लालसा न ठेवता भाजपसाठी, नवभारताच्या निर्मितीसाठी समर्पण द्यायचे आहे. वर्षभरात पद, समिती, मंत्रिपद काहीच मागू नका. तुमच्या त्यागाचे आम्ही मूल्यमापन करू असे फडणवीस यांनी सांगितले. आमदारांनी मंत्रिपद मागू नका असे म्हणताच पदाधिकाऱ्यांनी जोऱ्यात टाळ्या वाजविल्या. त्यावेळी असे नाही मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, असे स्पष्ट केले. बैठक संपल्यानंतर फडणवीस यांनी त्याग करा असा शब्दप्रयोग केला. त्यामुळे पदाधिकारी, आमदार याच शब्दावर उपहासात्मक चर्चा सुरू होती.
नाना पटोले वझे प्रकरण विसरू देत नाहीत
अंबानी यांच्या घराबाहेर देवेंद्र फडणवीस यांनी स्फोटके ठेवली असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी केला. त्यावर फडणवीस म्हणाले, "मी मुख्यमंत्री असताना सचिन वाझेला पोलिस दलात परत घ्या म्हणून माझ्यावर ठाकरे यांचा दवाब होता, पण मी घेतले नाही. महाविकास आघाडीची सत्ता येताच वाझेला सेवेत घेतले. या वाझेने कशी कशी वसुली केली याचे रॅकेट पुढे आले. वझेचे प्रकरण लोक विसरत असताना नानाभाऊ पुन्हा तो विषय उकरून काढतात त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे
- कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथ साठी मायक्रो प्लॅनिंग करावे.
- आपल्याला पक्षात हौसे, नवसे, गवसे सर्वच लागतात.
- राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणे यातील फरक काय हे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दाखवून दिले.
- राजीनामा प्रकरणावरून स्वतःकडे टीआरपी घेण्याचे कौशल्य पवारांच्या कडून शिकले पाहिजे.
- कर्नाटक निकालानंतर भाजपचा जोर ओसरला म्हणणाऱ्या पवारांना १६ राज्यात भाजप सत्तेत आहे, आठ राज्यात प्रमुख विरोधक आम्हीच आहोत हे त्यांना माहिती नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.