पुणे : पुणे जिल्ह्यातील पाच हजार १८० बालकांना जन्मतःच विविध दुर्धर आजारांनी ग्रासले असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने संयुक्तपणे करण्यात आलेल्या पाहणीत दिसून आले आहे. यामधील सर्वाधिक १ हजार ४८८ बालकांना कान, नाक, घसा (ईएनटी) आणि श्रवण दोष असल्याचे आढळून आले आहे.
यंदा पहिल्यांदाच या तपासणीसाठी डायग्नॉस्टिक सपोर्ट सिस्टीमचा (अचूक रोगनिदान करणारी प्रणाली) वापर करण्यात आला. आतापर्यंत वजन व उंचीच्या आधारे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीतून या आजारांचे निदान केले जात असे. परंतु या नव्या प्रणालीमुळे जिल्ह्यातील बालकांमधील विविध दुर्धर आजारांचे अचूक निदान होण्यास मदत झाली आहे.
या मोहिमेत जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे रोगनिदान करण्यात आले. या अचूक रोगनिदान प्रणालीमध्ये विविध ३३ प्रश्न फीड करण्यात आले होते. या प्रश्नांची उत्तरे पालक आणि विद्यार्थ्यांकडून जाणून घेण्यात आली. या मिळालेल्या उत्तरांच्या आधारे हे रोगनिदान केले असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी (ता.१४) सांगितले.
दरम्यान, या तपासणी मोहिमेत बालकांना त्वचा विकार, जन्मतः व्यंग किंवा शारिरिक दोष, श्रवणदोष, कान, नाक, घसा, शारिरिक दुर्बलता, बालपणीचे आजार आणि नेत्रदोष आदी दुर्धर आजारांचे निदान झाले आहे. दुर्धर आजारांचे निदान झालेल्या सर्व बालकांची आता त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतर हे आजार मुळापासून दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने या बालकांवर उपचार केले जाणार आहेत. काही बालकांना एखाद्या शस्त्रक्रियेची गरज भासल्यास, पुण्यातील ससून रुग्णालयाच्या मदतीने याबाबतच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याचेही प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले.
आजारनिहाय बालकांची संख्या
त्वचारोग ५६७
जन्मतः व्यंग किंवा दोष २३७
श्रवणदोष (कान, नाक, घसा) १४८८
शारिरिक दुर्बलता १३७०
बालपणीचे आजार ३२६
नेत्रदोष ११९२
एकूण ५१८०
विविध आजारांची मिळून तालुकानिहाय एकूण बालके
आंबेगाव ३३५
बारामती २६८
भोर १२६
दौंड २५१
हवेली ७६७
इंदापूर ३९४
जुन्नर ३२४
खेड १७३५
मावळ १६६
मुळशी ८२
पुरंदर २७२
शिरूर ४५३
वेल्हे ०७
एकूण ५१८०
पुणे जिल्ह्यातील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी यंदा पहिल्यांदाच डायग्नॉस्टिक सपोर्ट सिस्टीमचा (अचूक रोगनिदान प्रणाली) वापर केला आहे. यामुळे बालकांमधील विविध आजारांचे अचूक निदान होण्यास मदत झाली आहे. या बालकांवर या आजारातून बरे होण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने औषधोपचार केले जाणार आहेत. गरज भासल्यास ससूनमध्ये दाखल करून आवश्यक शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
आयुष प्रसाद,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.