पंधरावा वित्त आयोग पावला; जिल्ह्याच्या तिजोरीत 'इतक्या' कोटींची पडली भर!

Fund
Fund
Updated on

पुणे : केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाच्या बंधित निधीचा (टाईड ग्रॅंट) पहिला हप्ता वितरित केला आहे. यामुळे पुणे जिल्ह्याला पंधराव्या वित्त आयोगाचा आणखी ८५ कोटी ५१ लाख ६७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यापैकी निम्मा निधी पिण्याचे पाणी, स्वच्छता, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल व दुरुस्ती आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी उपक्रमांना खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्याला प्राप्त झालेल्या या एकूण निधीत ग्रामपंचायतींना ८० टक्के, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना प्रत्येकी १० टक्के निधी वितरित केला जाणार आहे. 

तेराव्या वित्त आयोगापर्यंत या निधीत जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना हिस्सा देण्यात येत असे. परंतू चौदाव्या वित्त आयोगाचा संपूर्ण निधी फक्त ग्रामपंचायतींना देण्यात आला. मात्र पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत पुन्हा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना हिस्सा देण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायतींना पुर्वी मिळणाऱ्या निधीत आता २० टक्के कपात झाली आहे. 

दरम्यान, याआधी पंधराव्या वित्त आयोगाच्या बेसिक  ग्रॅंटचा (पायाभूत निधी) पहिला हप्ता २९ जून २०२० ला मिळालेला आहे. याही हप्त्याची रक्कम ही बंधित निधीच्या रकमेएवढीच आहे. 
बंधित निधीपैकी जिल्हा परिषद व सर्व पंचायत समित्यांना मिळून प्रत्येकी ८ कोटी ५५ लाख १७ हजार तर, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना मिळून ६८ कोटी ४१ लाख ३३ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.

राज्यात १ एप्रिल २०२० पासून पंधराव्या वित्त आयोगाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. मात्र २९ जूनपर्यंत  यासाठी जिल्हा परिषदेला कवडीचाही निधी उपलब्ध झाला नव्हता. २९ जूनला बेसिक ग्रॅंटचा पहिला हप्ता तर आता बंधित निधीचा  पहिला हप्ता असे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचे दोन हप्ते मिळाले आहेत.केंद्रीय वित्त आयोगातून दरवर्षी देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास कामांसाठी निधी मिळत असतो.

बंधित निधीचा संस्थांनिहाय हिस्सा (रुपयांत)

- जिल्हा परिषद (१० टक्के) - ८ कोटी ५५ लाख १७ हजार.

- तेरा पंचायत समित्या (१० टक्के) - ८ कोटी ५५ लाख १७ हजार.

- जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्या मिळून - १७ कोटी १० लाख ३४ हजार.

- सर्व ग्रामपंचायती (८० टक्के) - ६८ कोटी ४१ लाख ३३ हजार.

- एकूण - ८५ कोटी ५१ लाख ६७ हजार.

जिल्ह्यला आतापर्यंत १७१ कोटी

पुणे जिल्ह्याला या महिनाभरात पंधराव्या वित्त आयोगाचे दोन स्वतंत्र हप्ते मिळाले आहेत. यामध्ये बेसिक ग्रॅंट आणि टाईड ग्रॅंट या दोन्ही ग्रॅंटच्या पहिल्या हप्त्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे दोन्ही हप्त्यात प्राप्त झालेला निधी सारखाच आहे. यामुळे जिल्ह्याला आतापर्यंत पंधराव्या वित्त आयोगाचे एकूण १७१ कोटी ३ लाख ३४ हजार रुपये मिळाले आहेत.  

पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त होणाऱ्या निधीतील निम्मा निधी हा पिण्याचे पाणी, स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आदींसाठी राखीव आहे. यामुळे जिल्ह्यातील गावांना पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यास पुरेसा निधी उपलब्ध झाला आहे. 

- निर्मला पानसरे, जिल्हा परिषद अध्यक्षा, पुणे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.