पुणे - जिल्ह्यातील १२४ जिल्हा परिषद शाळांवर सध्या एकही शिक्षक कार्यरत नसल्याचे जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या पडताळणीत दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने आता या शाळांचे झिरो शिक्षकी शाळा (शून्य शिक्षकी शाळा) असे नामकरण केले आहे. या सर्व शाळांमध्ये मिळून सध्या एक हजार ८९० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शिक्षकच नसल्याने या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शून्य शिक्षकी शाळांमध्ये भोर तालुक्यातील सर्वाधिक ४४ शाळांचा समावेश आहे. हवेली, इंदापूर आणि शिरूर तालुक्यातील प्रत्येकी एक शाळा असल्याचे जिल्हा परिषदेच्या वतीने याबाबत करण्यात आलेल्या पडताळणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुळशी तालुक्यातील दासवे येथील जिल्हा परिषद शाळेत १२१ विद्यार्थी शिक्षण घेत असून, सध्या या शाळेवर एकही शिक्षक कार्यरत नसल्याने एवढी मोठी विद्यार्थी संख्या असलेली ही शाळासुद्धा झिरो शिक्षकी शाळा झाली आहे.
येत्या १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. शाळा भरण्याच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून अवघड क्षेत्रातील शाळांवर काम केल्यानंतर यंदाच्या बदली प्रक्रियेत बदली झालेल्या क्षिक्षकांना त्यांच्या मूळ शाळांवरून अद्याप कार्यमुक्त केलेले नाही. यामुळे या शिक्षकांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होता आलेले नाही. यामुळे कार्यमुक्तीच्या मागणीसाठी या शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.
तालुकानिहाय झिरो शिक्षकी शाळा
भोर --- ४४
खेड --- २६
मुळशी --- २०
वेल्हे --- १६
मावळ --- १०
जुन्नर --- ०५
हवेली --- ०१
इंदापूर ---०१
शिरूर --- ०१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.