पुणे जिल्हा पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणणार
पुणे - प्रशासन, खासगी पर्यटन क्षेत्रातील उद्योजक (Entrepreneur) आणि तज्ज्ञांच्या मदतीने एकाच छत्राखाली जिल्हा पर्यटनाचा आराखडा (District Tourism Plan) तयार करण्यात यावा. या आराखड्याची अंमलबजावणी करून पुणे जिल्ह्याचे नाव पर्यटनाच्या जागतिक नकाशावर (Global Map) आणण्यात येईल, असा निर्धार प्रशासनासह (Administrative) तज्ज्ञांनी व्यक्त केला.
खासदार ॲड. वंदना चव्हाण यांच्या पुढाकारातून जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी (ता. ३) ऑनलाइन पर्यटनविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, ‘डीसीएफ’चे राहुल पाटील, पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक हरणे आणि तज्ज्ञांनी पर्यटन विकासाबाबत विविध संकल्पना मांडल्या. या वेळी तज्ज्ञांनी जिल्ह्यातील पर्यटनाची संधी आणि अंमलबजावणीबाबत सादरीकरण केले.
जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी ‘रोड मॅप’ तयार करण्यात यावा. पर्यटन विकासाचे कामकाज हे निरंतर चालणार आहे. प्रशासनात कोणीही अधिकारी आल्यानंतर त्यांना हा प्रकल्प पुढे नेता येईल, अशी प्रणाली तयार करावी. संबंधित अधिकाऱ्यांनी संपूर्ण एक दिवस पर्यटनविषयक कामकाजासाठी दिल्यास त्याला गती मिळेल.
- ॲड. वंदना चव्हाण, खासदार
पर्यटन क्षेत्रातील सर्व एजन्सींना एकाच प्लॅटफॉर्मखाली सोबत घेउन पर्यटन आराखड्याची अंमलबजावणी करावी. पालकमंत्री अजित पवार यांचाही पर्यटन विकासाबाबत सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधा उभारण्यास निधीची कमतरता पडणार नाही.
- सौरभ राव, विभागीय आयुक्त-
पर्यटन महामंडळासोबतच पर्यटनाच्या खासगी क्षेत्रातील प्रमुख उद्योजकांकडे उत्तम दर्जाचे नेटवर्क आहे. त्यांच्यासह स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने टुरिझम प्लॅटफॉर्म तयार करण्यात यावा. या कार्यशाळेमुळे तज्ज्ञांच्या मदतीने पर्यटन विकासाचा कृती आराखडा तयार करण्यास मदत होणार आहे.
- विक्रम कुमार, महापालिका आयुक्त
जिल्ह्यात हेरिटेज, कृषी, क्रीडा, आरोग्य, आध्यात्मिक, सांस्कृतिक पर्यटन वाढीसाठी संधी आहे. पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच, राज्याच्या उत्पन्न वाढीत पर्यटनाचा मोठा वाटा आहे. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास पुणे जिल्हा पर्यटन हब होइल.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
पर्यटनातून महसुलासोबत रोजगार निर्मितीही झाली पाहिजे. सर्वसामान्यांच्या आवाक्यातील पर्यटन असावे. पर्यटनाच्या वाढीसाठी या क्षेत्रातील उद्योजक, टूर ऑपरेटर्स, गाइड आणि स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येईल. पर्यटन स्थळांचे ब्रॅंडिंग करण्यासोबतच तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे.
- विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी
प्रशासनाकडून जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्रित येत आहेत. त्यामुळे उत्तम दर्जाचा पर्यटनाचा कृती आराखडा तयार होऊन जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.
- दीपक हरणे, प्रादेशिक अधिकारी, एमटीडीसी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.