पुणे - अभियांत्रिकी, औषधनिर्माण आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांतील तब्बल ३१ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज अजूनही पुणे विभागातील महाविद्यालयांकडे प्रलंबीत आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीच्या तीन वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजनांच्या अर्जाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन तंत्रशिक्षण विभागाच्या (डीटीई) वतीने करण्यात आले आहे.
तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहापासून ते शिष्यवृत्तीपर्यंत विविध योजना राबविण्यात येतात. ज्यामध्ये वंचित घटकांबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. यंदा पुणे विभागात जवळपास एक लाख ३७ हजार विद्यार्थ्यांनी विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. त्यातील ८८ हजार अर्जांची प्रक्रिया शैक्षणिक संस्थांनी पूर्ण केली आहे.
मात्र, अजूनही ३१ हजार अर्ज संस्थांच्या स्तरावर प्रलंबीत आहे. तंत्रशिक्षण विभागाकडे शिष्यवृत्तीसाठी पुरेसा निधी असून, शैक्षणिक संस्थांच्या पातळीवर तातडीने अर्थप्रक्रिया पूर्ण करण्याची गरज डीटीईने व्यक्त केली आहे. यासाठी वारंवार बैठका घेऊन महाविद्यालयांना कळविण्यात आल्याचेही डीटीईने सांगितले. व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीच्या दृष्टीने अधिक जागृती करण्याची गरज आहे.
७९ हजार अर्ज मंजूर -
तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने जवळपास ७९ हजार (७८,८४०) विद्यार्थ्यांचे अंतिम अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तर नऊ हजार अर्ज विभागाकडे मंजूर स्तरावर आहे. सर्वाधिक अर्ज हे शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेतील असून, वसतीगृह भत्त्यासाठी सात हजार ८३० अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे तर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची दोन हजार ४८५ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
शैक्षणिक संस्थांकडील अर्जाची स्थिती -
शिष्यवृत्तीचे नाव - एकूण अर्ज - मंजूर केलेले अर्ज - प्रलंबीत अर्ज
१) डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निवृत्ती भत्ता योजना - ३५८९९ - १३६६२ - १६८६५
२) राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती - ९७२१५ - ७१७९२ - १३५७०
३) अल्पसंख्याक शिष्यवृत्ती - ३९७४ - २६३३ - १०१५
गरजू आणि होतकरू विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये म्हणून विभाग सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. महाविद्यालयांनी त्यांच्याकडील शिष्यवृत्ती अर्जांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. म्हणजे विभागस्तरावर त्याला अंतिम मंजुरी देता येईल.
- डॉ. दत्तात्रय जाधव, सहसंचालक, डीटीई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.