Shivaji Nagar Pune: डीजेची चाचणी करण्याच्या नावाखाली गोखलेनगर येथील हुतात्मा तुकाराम ओंबाळे मैदानावर विनापरवाना प्रत्येक शनिवार आणि रविवारी मोठ्या आवाजात डिजे लावण्यात येतात. डिजे'च्या आवाजाची कोणतीही मर्यादा नसते किंवा पोलिसांचे भय नसते.
दुपारी तीनच्या सुमारास डीजे मोठ्या आवाजात अचानक सुरू केले जातात, त्यामुळे जेष्ठ नागरिक, लहान मुले घाबरतात. कोणताही सण , उत्सव नसतानाही काही तरूण मुलं शहरातील विविध भागातून डीजे चाचणीसाठी गोखलेनगरमध्ये येऊन दहशत माजवत आहेत.
डीजे कोणत्या वेळेत लावण्यात येणार आहेत? याची माहिती आगोदरच सोशल मीडियाच्या माध्यमातून परिसरात व्हायरल केली जाते. डीजे चालू केल्यावर मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी होते.
दीड ते दोन तास मोठ्या आवाजात डीजे तपासणी केल्यानंतर मैदानात असलेल्या महापालिकेच्या खोलीत मद्यपान, आमली पदार्थाचे सेवन, गुडागर्दी, मोठ्या आवाजात शिव्या देणे असे प्रकार चालतात.
मैदानासमोरील पदपथावर अनधीकृत हातगाड्या लावलेल्या आहेत, त्यामुळे पादचाऱ्याना चालणे देखील कठीण झाले आहे. परिसरातील राहिवासी या नियमित होणाऱ्या त्रासाने हैराण झाले आहेत. पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूण देखील याकडे पोलिस दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. विनापरवाना महापालिकेच्या मैदानवर मोठ्या आवाजात डीजे लावले जातात, मैदानावर असलेल्या खोलीत मद्यपान केले जाते, यावर शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त काही कार्यवाही करताना दिसत नाहीत.
या ठिकाणी विनापरवाना लावण्यात येणाऱ्या डीजेवर कडक कारवाई करावी, मद्यपान करणाऱ्या तरूणांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी चतुश्रुंगी पोलिस ठाण्याकडे संपदा राऊत व परिसरातील महिलांनी केली आहे. अधिक माहितीसाठी चतुश्रुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बाळकोडगी यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त रवि खंदारे म्हणाले, "सबंधीत खोलीचा ताबा आमच्याकडे घेऊन कार्यवाही करायला सांगतो."
"गोखलेनगर येथील रहिवासी परिसरात मोठ्या आवाजात डीजे लावला जातो, या आवाजाने लहान मुले, जेष्ठ नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ११२ नंबरला फोन करून तक्रारी केल्या तरी देखील काही उपयोग होत नाही. वर्षभर शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवसी असा प्रकार या ठिकाणी होतो. डीजे लावणारे सांगतात परवानगी घेऊन लावला आहे. मात्र यांना परवानगी मागितली तर दमदाटी करतात, मैदान तुमच्या बापचं आहे का? असे उलट प्रश्न करून महिलांच्या अंगावर धाऊन येतात. पोलिस, महापालिकेचे अधिकारी कारवाई करत नसल्याने तरूणांची गुंडागर्दी फोफावत चालली आहे."
“कोणताही सण, उत्सव नसतानाही मोठ्या आवाजात डीजे लावण्यात येतो. डिजेच्या आवाजाने घरं हदरून जातात.
माझे वडील ७४ वर्षाचे आहेत त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. रात्री मैदानावर मद्यपान करून काही मुलं मोठ्या आवाजात शिवीगाळ करतात.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.