पुणे - भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेली नदी म्हणजे गंगा. ही नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण्याची कथा खिळवून ठेवणाऱ्या नृत्यातून उलगडली. प्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्री हेमामालिनी यांनी सादर केलेल्या ‘गंगा’ या बॅलेतून साक्षात गंगा नदीच मंचावर अवतरल्याचा अनुभव रसिकांना आला.
निमित्त होते, ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे. या फेस्टिव्हलच्या पॅट्रन असणाऱ्या हेमामालिनी या ३० वर्षांपासून यात सहभागी होत आहेत. आपला नवीन बॅले त्या पहिल्यांदा पुणे फेस्टिव्हलच्या मंचावरच सादर करतात. यंदाही ती परंपरा कायम राखत त्यांनी ‘गंगा’ हा बॅले सादर केला.
गंगा नदीच्या पृथ्वीवर अवतरण्याची पौराणिक कथा मांडतानाच आज सर्वांनी गंगा नदीसह सर्वच नद्यांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा संदेशही यातून देण्यात आला. याची संकल्पना, कथा, दिग्दर्शन व निर्मिती स्वतः हेमामालिनी यांनी केली आहे. याचे संगीत रवींद्र जैन, अशीत देसाई, आलाप देसाई यांचे होते. नृत्य दिग्दर्शन भूषण लकंद्री, वेशभूषा नीता लुल्ला, संशोधन राम गोविंद, संवाद व गीते रवींद्र जैन, शेखर अस्तित्व यांचे होते तर गायक सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन, मिका सिंह, रेखा राव, हेमा देसाई आणि आलाप देसाई हे होते.
यावेळी फेस्टिव्हलचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि मीरा कलमाडी यांच्या हस्ते हेमामालिनी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात भोपाळ येथील व्ही. अनुराधा सिंह आणि जबलपूर येथील निलांगनी कलंत्रे या प्रसिद्ध कथक नृत्यांगनांनी नृत्याविष्कार सादर केला.
तनिष्काचा गौरव
पुणे फेस्टिव्हलच्या महिला महोत्सवात ‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठाचा गौरव करण्यात आला. तनिष्का व्यासपीठाच्या वतीने सहयोगी संपादक वर्षा कुलकर्णी यांनी हा गौरव स्वीकारला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.