Pune Flood : पाणी ओसरले; घर गाळात गेले! स्वच्छता करताना नागरिकांचे हाल

मुठा नदीला आलेल्या पुरात आख्खे घर पाण्यात बुडाले. अन्न धान्यापासून कपडे लत्ते, मुलांच्या वह्या पुस्तकेही पाण्यात बुडाली.
Women Cleaning home after flood
Women Cleaning home after floodsakal
Updated on

पुणे - मुठा नदीला आलेल्या पुरात आख्खे घर पाण्यात बुडाले. अन्न धान्यापासून कपडे लत्ते, मुलांच्या वह्या पुस्तकेही पाण्यात बुडाली. आता पुराचे पाणी ओसरले असले तरी संसार पूर्ण गाळात गेलाय. तो पुन्हा उभा करण्याची धडपड एकतानगरी परिसरातील नागरिकांची सुरू होती. संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणचे पंचनामे पूर्ण न झाल्याने घराची स्वच्छताही अनेकांना करता येत नव्हती.

पुणे शहर आणि जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुठा नदीला पूर आला. हे पुराचे पाणी वारजे, सिंहगड रस्ता, पुलाची वाडी, पाटील इस्टेट, खिलारे वस्ती या भागात शिरले. त्याचा सर्वाधिक फटका सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी, निंबोजनगर भागाला बसला आहे. या परिसरातील सुमारे ६५ सोसायट्यांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे पुराचा फटका बसला आहे.

पुराचे पाणी आज ओसरल्यानंतर पुणे महापालिकेने या भागात स्वच्छतेला सुरुवात केली. एकतानगरी भागात जेटिंग मशिनने सोसायट्यांमध्ये पाणी मारून गाळ बाहेर काढला जात होता. सांडपाणी व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी सेक्सेशन मशिनने सांडपाणी वाहिनीतील गाळ बाहेर काढला जात होता. ज्यांची घरी तळमजल्यावर होती, त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. घरात सहा फुटापेक्षा पाणी जास्त असल्याने संपूर्ण संसारच पाण्यात बुडाला असल्याचे रहिवाशांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

वीज पुरवठ्याची प्रतिक्षा

पुराचे पाणी ओसरल्यानंतर महावितरण कंपनीने वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी ट्रान्सफार्मची दुरुस्ती, बदलणे याचे काम सुरू केले आहे. सायंकाळपर्यंत १९ पैकी १४ ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यात आले होते. पण सोसायट्यांच्या मीटरमध्ये पाणी असल्याने शॉटसर्किटचा धोका असल्याने वीज पुरवठा सुरू करण्यात आला नव्हता. अनेक सोसायट्यांच्या जनरेटरमध्यही पाणी गेल्याने जनरेटर दुरुस्त करून सोसायटीची लिफ्ट व दिवे सुरू करून घेण्यात आले. सलग दोन दिवस वीज पुरवठा बंद असल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत.

जेथे नेते येथे स्वच्छता

सिंहगड रस्ता भागात पुरामुळे जास्त नुकसान झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह आमदार, खासदारांनी या भागात पाहणी केली. पण बहुतांश नेते हे एकतानगरी भागातच गेले, तेथे जाऊन त्यांनी नागरिकांची संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

नागरिकांच्या अडचणी त्वरित सोडवा असे आदेश नेत्यांनी दिले. त्यामुळे महापालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्या, कर्मचारी, पाण्याचे टँकर, जेटींग मशिन ही यंत्रणा जिथे नेत्यांची गर्दी तेथेच जास्त होती, असे चित्र पाहणीमध्ये दिसून आले.

महापालिकेची यंत्रणा कमी पडत असल्याने प्रत्येक सोसायटीमध्ये स्वच्छता करता येत नव्हती. त्यामुळे काही सोसायट्यांनी स्वखर्चाने मजूर लावून स्वच्छता करून घेतली. सोसायटीच्या आतमध्ये फवारणी करून घेतली. अनेकांनी घराच्या स्वच्छतेसाठी बाहेरची यंत्रणा वापरली.

नदीला पूर आल्याने सोसायटीच्या समोरच्या रस्त्यावर पाणी आले होते. पण आम्हाला अग्निशामक दलाच्या जवानांनी घराबाहेर पडा असे केलेले आवाहन ऐकूच आलेले नव्हते. सहा वाजता शेजाऱ्यांनी आम्हाला झोपेतून उठवून पूर आला आहे घराबाहेर या असे सांगितले.

आधी मुलांना सुरक्षीत ठिकाणी नेले. त्यानंतर आम्ही घरात येऊन साहित्य भिजू नये यासाठी प्रयत्न केला, पण पाणी खूप वेगाने वाढत होते, आम्हाला काहीच करता आले नाही. अखेर छातीऐवढ्या पाण्यातून मी आणि माझा भाऊ बाहेर पडलो, असे संतोष मानवतकर यांनी सांगितले.

अशी आहे पूरसीमा

विसर्ग क्युसेस - बांधित होणारे क्षेत्र

  • १८ हजार - भिडे पूल

  • २८ हजार - खिलारे वस्ती

  • ३० हजार - कामगार पुतळा परिसर

  • ३५ हजार - पुलाची वाडी

  • ४० हजार - तोफखाना परिसर, डेक्कन पीएमपी बसथांब्याच्या मागील बाजू

  • ४५ हजार - पूना हॉस्पिटलचा मागचा भाग, नारायण पेठ, अमृतेश्‍वर मंदिर शनिवार पेठ, नेने घाट, शेख सल्ला दर्गा, मनपा वसाहत कसबा पेठ, मंगळवार पेठ, ताडीवाला रस्ता

  • ५० हजार - शिवण्यातील नदीलगतचा भाग, हिंगणे, अलंकार पोलिस चौकीजवळचा कर्वेनगर रस्ता

  • ५४ हजार - जयंतराव टिळक पूल पाण्याखाली जातो

  • ५५ हजार - कोंढवे-धावडे, भीमनगर ओढ्यालगतचा भाग, न्यू कोपरे हद्द, उत्तमनगर इंदिरानगर वसाहत, नांदेड नदीलगतचा भाग, वडगाव बुद्रुक सर्व्हे क्रमांक १४ व १५, हिंगणे खुर्द सर्व्हे क्रमांक - १८, आंबिल ओढ्यालगतचा भाग, दत्तवाडी व राजेंद्रनगर

  • ६० हजार - पाटील इस्टेट झोपडपट्टी

(किती क्युसेस पाणी सोडल्यानंतर कोणता भाग पाण्याखाली जातो, हे पाटबंधारे विभागाकडून निश्‍चित)

४ हजार - पूरबाधित नागरिक

खडकवासला धरणातून किती पाणी सोडल्यानंतर आमच्या भागात किती पाणी घुसते याचा अंदाज आम्हाला आहे. पण यावेळी पूर्वकल्पना दिली नाही. अचानक घराबाहेर जा असे सांगण्यात आले. थोडे आधी सांगितले असते तर घरातील महत्त्वाचे सामान हलविता आले असते. माझ्या घरातील फ्रिज, वॉशिंगमशीन, टीव्ही, अन्नधान्य, कपडे, अंथरूण पांघरून, मुलांच्या वह्या, पुस्तक यासह सगळे पाण्यात बुडाले आहे. दिवसभर आम्ही घरातील गाळ बाहेर काढत आहोत.

- सचिन बारे

मी घरातून लोणचे, फळांचा पल्प तयार करून विक्रीचा व्यवसाय करते. पुराचे पाणी घरात घुसले आणि सगळ्या मशिन पाण्यात बुडून खराब झाल्या. माझा मुलगा सीए करतो आहेत, त्याचे सगळे पुस्तके भिजून खराब झाली, फर्निचरही खराब झाले. आता आम्हाला घरात साधे अंथरूण पांघरूनही नाही, अशी अवस्था झाली आहे.

- नीशा वाघ

विठ्ठलनगर वाऱ्यावर

महापालिकेची बहुतांश यंत्रणा एकतानगरी आणि निंबोजनगर भागात होती. पण एकतानगरीपासून जवळच असलेल्या विठ्ठलनगरमध्ये महापालिकेची यंत्रणा नव्हती. सकाळच्या वेळी घनकचरा विभागाचे काही कर्मचाऱ्यांनी येऊन कचरा उचलून नेला. पण भागातील गाळ काढण्यासाठी रस्ते स्वच्छ करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी दुपारी चार वाजून गेले तरीही पोचलेले नव्हते.

रस्त्यावर, सोसायटीच्या पार्किंगमधील घाण पाणी आणि चिखलाचा दुर्गंध येण्यास सुरवात झाली होती. तसेच पंचनाम्याचे दुपारी सुरु होते, कर्मचारी दुपारी जेवणासाठी गेल्यानंतर बराच काळ आले नव्हते. त्यामुळे नागरिकांना घराची स्वच्छताही करता येत नव्हती. त्यामुळे स्थानिक नागरिक, मंडळाचे, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शोधून आणत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.