पुणे : कोथरूड परिसरातील ‘एआरएआय’ टेकडीवर दोन महाविद्यालयीन युवती नशेत बेधुंद अवस्थेत शनिवारी (ता. २४) सायंकाळी आढळून आल्या. या घटनेचा रविवारी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांना धक्का बसला. या युवती आपल्याच घरातील असत्या तर, असा विचार अनेकांच्या मनात डोकावलाही असेल. युवती पुण्यातल्या होत्या की परजिल्ह्यातल्या, त्यांची संख्या किती होती, त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केले की मद्य प्राशन केले, या प्रश्नांपेक्षा शिक्षणाच्या माहेरघरात चाललेल्या अशा प्रकारांकडे नागरिकांबरोबर पालक, शिक्षण संस्था, पोलिस प्रशासनाने गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे. श्रीमंतांची मुले, इझी मनी, हक्क व स्वातंत्र्यावर गदा...अशा विषयांवर चर्चा करून मूळ विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे कालच्या घटनेवरून स्पष्ट होते.
शनिवारच्या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही युवतींना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या दोघींना उपचारानंतर घरी सोडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेने ‘एआरएआय’सह इतर टेकड्यांवर नशेबाजांची संख्या वाढत चालल्याचे समोर आले आहे. एआरएआय’ टेकडीवर शनिवारी सायंकाळी २० वर्षीय दोन महाविद्यालयीन युवती बेधुंद अवस्थेत आढळून आल्या.
याबाबत अभिनेते रमेश परदेशी यांनी रविवारी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला. त्यात या टेकडीवर दोन युवती नशेत बेधुंद असल्याचे दिसत होते. ‘‘पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या श्रीमंत घरातील मुला-मुलींना घरातून ‘इझी मनी’ मिळतो. शहरात शिकायला यायचं आणि असे धंदे करायचे. पालक म्हणून मला हे पाहून घाबरायला होतं. पुणेकरांनी याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. पब, डिस्कोमध्ये रात्री अपरात्री मुले-मुली ड्रग्ज घेऊन पडतात. आई-वडील त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. टेकड्यांवर लोक व्यायाम करण्यासाठी येतात.
परंतु याठिकाणी आता तरुण मुले-मुली नशा करीत आहेत. पानटपऱ्यांमध्ये ड्रग्ज सहज उपलब्ध होत आहे. आपण याकडे लक्ष देणार आहोत का? अमली पदार्थांच्या विळख्यात तरुण पिढी बरबाद होत आहे, याबाबत पालकांनी आणि पुणेकरांनी विचार करावा, असे आवाहन परदेशी यांनी केले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य नशामुक्त (ड्रग फ्री) करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी शनिवारी पोलिस आयुक्तालयात एका कार्यक्रमात अमली पदार्थ तस्करांवर कठोर कारवाईचे आदेश दिले. पुणे पोलिसांनी नुकतीच मोठी कारवाई करीत तब्बल साडेतीन हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यानंतर ‘एआरएआय’ टेकडीवर नशेबाज युवती आढळून आल्याचा प्रकार घडला.
हा प्रकार ‘एआरएआय’ टेकडीवर शनिवारी सायंकाळी घडला आहे. दोन्ही युवती टेकडीवर फिरण्यासाठी आल्या होत्या. त्या युवतींनी बिअर प्राशन केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी त्या दोघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. युवतींनी कोणत्याही प्रकारच्या ड्रग्जचे सेवन केलेले नाही.
- संदीप देशमाने,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोथरूड
तिच्या वडिलांना काय वाटत असेल?
मुलीला डॉक्टर व्हायचंय आणि गावामध्ये पर्याय उपलब्ध नसल्याने तिला शहरातील महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी पाठवले होते...तिला लहानपणापासूनच बाहेर शिकायचं होते...पण आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने आणि मुलगी जवळच राहील, तीन-चार तासांच्या अंतरावर असल्याने काका-काकूचेदेखील लक्ष राहील म्हणून पुण्यात शिक्षणासाठी पाठवले...काही दिवसांपूर्वी पुण्यात चार हजार कोटींचे अमली पदार्थ सापडल्याची बातमी पहिली...या बातमीला चारही दिवस झाले होते. आणि रविवारी सकाळी (ता. २५) कोथरूडमधील ‘एआरएआय’ टेकडीवर दोन तरुणी बेधुंद अवस्थेत दिसल्या. अंगावर शहारेच आले. आणि हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत होता. त्या मुलींना पाहून डोक्यात एकच प्रश्न फिरत होता... तिच्या वडिलांना काय वाटत असेल नक्की?... एका तरुणीने व्यक्त केलेली ही बोलकी प्रतिक्रिया.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.