Pune - पुरंदर तालुक्यातील वीजप्रश्न तीव्र स्वरुपाचा झाला आहे. वीज महावितरणच्या अनेक कामांत अनियमितता, भ्रष्टाचार, व्होलटेज कमी असणे, विद्युत उपकरणे जळणे, वीज चोरीला खतपाणी घालणे, सामान्य ग्राहकांची पिळवणुक करणे, व्यावसायिक ग्राहकांचे जादा पैसे घेऊन त्यांना सुविधा लगेच देणे आणि इतर वीज ग्राहकांच्या प्रचंड तक्रारी पाहून आज मी वीज महावितरणच्या प्रमुख अभियंत्यांची बैठक घेतली.
त्यात त्यांच्यासमोर कित्येक प्रलंबित प्रकरणे, वीजग्राहकांच्या, शेतकरी वीजग्राहकांच्या अनेक लेखी तक्रारी मांडल्या. शेवटी कामकाजातील सुधारणेसाठी 2 जुलैची पर्यंत मुदत दिली आहे. सुधारणा न झाल्यास 3 जुलैपासून मी स्वतः जनतेसह सासवडला महावितरणच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे., असे आमदार संजय जगताप यांनी आज सासवड (ता.पुरंदर) येथे पत्रकार परीषदेत जाहीर केले.
अगोदर अनेकदा पुरंदर तालुक्यातील वीज महावितरण कंपनीच्या यंत्रणेस तोंडी, लेखी अनेकदा अनियमितता, भ्रष्टाचार, गैरकारभार याबाबत ठोस पुरावे देत इशारा दिला. तरीही वीज वितरणचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, उप कार्यकारी अभियंता उमेश सासणे, सहायक अभियंता गणेश गोरे, चंद्रशेखर महाजन व इतर अभियंता, अधिकारी हे मांडलेल्या गाऱहाण्याची, तक्रारींची, कामांतील त्रुटींची दखल घेत नाहीत.
त्यामुळे आज पुन्हा सर्व वीज वितरण यंत्रणेचे अभियंते, अधिकारी, प्रमुख पदाधिकाऱयांसह बैठक घेतली व निर्वाणीचा इशारा लेखी पत्राद्वारे दिला. यावेळी रखडलेल्या प्रश्नांची, कामांची यादीही यंत्रणे सादर केली. त्यातून 2 जुलैची मुदत देत.. 3 जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांना बोलून दाखविला., असे आमदार श्री. संजय जगताप म्हणाले.
मी वीज महावितरणच्या निगरगठ्ठ अभियंते, अधिकारी यांच्यापुढे हतबल झालो आहे, त्यातून ही पत्रकार परीषद आज (ता. 26) घेतली., असेही श्री. जगताप म्हणाले. यावेळी आमदार श्री. जगताप यांच्यासमवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नंदकुमार जगताप, पं.स.च्या माजी सदस्या सुनिता कोलते, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप पोमण, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव गणेश जगताप, संभाजी काळाणे, विठ्ठल मोकाशी, पुष्पा कदम, संतोष गिरमे आदी उपस्थित होते.
आमदारांनी याविषयी वेधले लक्ष .
* घरगुती ग्राहकांना वीजजोड देण्यासाठी तंगविले जाते
* शेतकऱयाला ट्रान्सफाॅर्मरवर लोड शिल्लक नाही म्हणून वीजजोडला विलंब केला जातो
* ट्रान्सफाॅर्मर जळला तर शेतकऱयाला वर्गणी काढून महाविरणच्या अभियंत्यास पैसे द्यावे लागतात
* जळलेल्या ठिकाणी तकलादू ट्रान्सफाॅर्मर बसवून बोळवण करतात, पुन्हा तो अल्पावधीत जळतो
* चोरुन आकडे टाकून जे वीज घेतात.. त्यांना महावितरणचे कर्मचारी आतल्या हाताने सामिलची चर्चा
* चोरुन आकड्यांचा लोड येऊन पुन्हा ट्रान्सफाॅर्मर जळतो, पुन्हा पैसे घ्यायला यंत्रणा तयारच असते
* व्यावसायिक ग्राहकांकडून `अर्थ`पूर्ण पुर्तता होते, त्यांना पोल टाकून त्वरीत कनेक्शन दिल्याचे पुरावे
* खासगी व्यावसायिक इमारतींना शासकीय निधीतील ट्रान्सफाॅर्मर व इतर साहित्य वापरुन गैरप्रकार घडतोय
* आंबोडीत एका हाॅटेलला रातोरात वीजजोड पोल टाकून दिले, शेजारील मागावर्गीय वस्तीला तिष्ठत ठेवल्याची घटना
* घरगुती व कृषीपंप ग्राहकांच्या वीज व्होल्टेजचा प्रश्न दिवसेंदिवस जटील., उपकरणे व पंप जळण्याच्या घटनेत वाढ
* 50 हजार टनावरुन ऊस उत्पादन तालुक्याचे साडेपाच लाख टनावर पोचले, पण वीज वितरण ऊसाबाबत ढिसाळ
* दिड ते दोन लाख टन ऊस केवळ वीज वितरण ढिसाळ असल्याने जळाला, शेतकऱयांचे आर्थिक नुकसान झाले
* शेतीला पाणी द्यायच्या वेळीच यांची वीज खंडीत होते, मजुरांची मजुरी देणे चुकत नसल्याने शेतकरी त्रासलेत
* सामान्यांना देतातच.. पण मलाही उडवाउडवीची उत्तरे देणाऱया पुरंदरच्या वीज अभियंत्यांनी खुर्च्या खाली कराव्यात
सासवडला माऊलींची पालखी येण्यादिवशी, पालखी आल्यावर समाजारतीच्या वेळी व पालखी मुक्काम कित्येकदा वीज खंडीत झाली. पालखीसाठी म्हणून अगोदर दोन महिने वीज वितरण यंत्रणा वीज घालवून देखभाल दुरुस्तीचे काम करीत होते.
मग हे काम फोल ठरले नाही का. वाल्हे येथेही पालखीकाळात वीजेचा लपंडाव सुरु होता. पावसाचे चार थेंब पडले की, पुरंदरमध्ये लगेच वीज गायब का होते. मग वीज यंत्रणा नक्की काय करते., असा सवाल आमदार संजय जगताप यांनी केला.
``पुरंदरला 86 ट्रान्सफाॅर्मर शासकीय निधीतून मंजुर पण बसविलेच नाहीत. सासवडच्या अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांचे काम पाच वर्षे अर्धवट पडून आहे. शासनाचा निधी वाया घालविला. जिल्हा नियोजन समितीद्वारे आलेल्या निधीतून ट्रान्सफार्मर व इतर साहित्य खासगी किंवा व्यावसायिक स्थळी वापरल्याबाबत आपण विधानसभेत प्रश्न मांडणार आहोत. आजच्या आपल्या आमरण उपोषणाच्या निर्णयाबरोबर बाकी लेखी तक्रारी ऊर्जा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून महावितरणच्या वरीष्ठांना व जिल्हाधिकारी यांना आजच पोचवित आहे.``
आमदार संजय जगताप, पुरंदर-हवेली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.