घोडेगाव : घोडेगाव (ता आंबेगाव) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवार (दि. १४) पासुन नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे किंवा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांची गैरसोय होऊन आर्थिक व मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. मार्च महिन्याचा इन होत असल्याने कर्जदाराला याचा विशेष फटका बसला आहे. खरेदी विक्री व्यवहार होत नसल्याने शासनाचा महसूल बुडत आहे.
दरम्यान सोमवार (दि. १४) पासुन दस्त नोंदणी प्रणालीमधील तांत्रिक समस्या अथवा सर्व्हरच्या डाऊन होण्यामुळे दस्त नोंदणीचे काम संथगतिने सुरू आहे. अपेक्षित वेग मिळत नसल्याने दस्त नोंदणीसाठी नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. तर काहींना दस्त नोंदणीसाठी दोन ते तीन दिवस हेलपाटे मारावे लागत आहे. यामध्ये विषेशतः जेष्ठ ७५ ते ८० वयोेगटातील महिला व पुरूषांचे हाल होत आहे. दरवर्षी मार्च महिन्यात ही समस्या उद्भवली जात आहे. शासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.
आंबेगाव तालुक्यात मोठया संख्येने सदनिकांचे खरेदी विक्री होत आहे. तसेच दुकाने, जमीन खरेदी विक्री, भाडेकरार, बक्षीसपत्र, मृत्युपत्र आदि कामांसाठी नोंदणी विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागत आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दस्त नोंदणीची ही संगणक प्रणाली राष्ट्रीय सूचना केंद्राने (एनआयसी) विकसित केली आहे. या प्रणालीसाठी तांत्रिक सहकार्य हे एनआयसीकडून दिले जाते.
राज्याला महसूल देणारा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग दुस-या क्रमांकाचा विभाग आहे. दरवर्षी हजारो कोटींचा महसूल राज्य शासनाच्या तिजारीत जमा होतो. या विभागाकडे शासनाने दुर्लक्ष होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या महसुलामध्ये दरवर्षी प्रमाणे वाढ होत असल्याने तसेच मार्च महिन्यात विविध बॅंका, पतसंस्था यांच्याकडे कर्जप्रकरण करण्यासाठी गहाणखत करावे लागत असल्याने त्यांचीही गर्दी होत आहे.
सर्व्हर कनेक्टिव्हिटी सुरळीत करण्याची मागणी पक्षकार ,वकील आणि नागरिक करत आहे. उद्या ही व्यवस्था सुरळीत न झाल्यास कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांनी दिला आहे.
आंबेगाव चे दुय्यम निबंधक अधिकारी एस. एस. वाव्हळ म्हणाले,
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रणालीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिघाड झाला आहे. एकच सर्व्हर असल्याने राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयात समस्या आहे. वरिष्ठस्तरावर हा अडथळा दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकर ही प्रणाली सुरळीत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.